एक्स्प्लोर
निवडणुकीतल्या वादातून एकाचा मृत्यू, आरोपींच्या अटकेसाठी नातेवाईकांचा शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या
चाळीसगावमधील वडगाव-लांबे येथील ग्रामपंचायत निवडणुकीतील लढतीत झालेल्या वादामुळे एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
धुळे : नुकत्याच महाराष्ट्रात ग्रामपंचायत निवडणुका झाल्या. याच दरम्यान निवडणुकीच्या वादातून झालेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांनी शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केलं. तर आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यासह त्यांना त्वरित अटक करण्याची मागणी कुटुंबियांची आहे.
जळगावच्या चाळीसगाव तालुक्यातील वडगाव लांबे या गावात 18 जानेवारी रोजी ग्रामपंचायतीच्या झालेल्या निवडणुकीत कोमल सिंग राजपूत यांच्या गटाचा विजय झाला. त्यांच्या विरोधात निवडणूक लढणाऱ्यांपैकी पराभूत झालेल्या गटातील संतोष पाटील यांना राग अनावर झाला. संतोष यांनी त्यांच्या इतर 22 साथीदारांसह कोमल सिंग राजपूत यांच्यासह काही विजयी सदस्यांना मारहाण करण्याचा प्रयत्न केला. झालेल्या मारहाणीत कोमल सिंग राजपूत यांच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीर जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी चाळीसगावमधील देवरे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांची प्रकृती जास्त खालावली आणि त्यामुळेच सहा दिवसांपूर्वी धुळ्यातील श्रद्धा हॉस्पिटल येथे त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र तिथूनही हिरे वैद्यकीय महाविद्यालय येथे त्यांना हलवण्यात आले.
आज सकाळी त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. त्यामुळे संतप्त झालेल्या नातेवाईकांनी धुळ्याच्या शवविच्छेदन गृहासमोर ठिय्या आंदोलन केलंय. याप्रकरणातील प्रमुख आरोपी असलेले संतोष पाटील, सोमसिंग पाटील, योगेश पाटील, संजय पाटील, अमर पाटील, राजेंद्र पाटील, केतन पाटील, मंगल पाटील, विजयसिंह पाटील, लखन पाटील, अरुण पाटील, देवराज पाटील या सर्वांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे आणि त्यांना ताबडतोब अटक करण्यात यावी अशी कुटुंबियांनी मागणी केली आहे. तर यावर प्रतिक्रिया देताना मेहुणबारे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन देसले म्हणाले की,"आरोपींवर आधीच 307 नुसार गुन्हा दाखल झाला असून शवविच्छेदन गृहाचा अहवाल प्राप्त होताच आरोपींवर 302 चा गुन्हा दाखल करणार आहे."
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
व्यापार-उद्योग
सोलापूर
महाराष्ट्र
Advertisement