Raavrambha : इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अनोखी प्रेमकथा घेऊन येतोय ओम भूतकर; 'रावरंभा' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज
Raavrambha : मोनालिसा बागल आणि ओम भूतकरचा 'रावरंभा' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Raavrambha Marathi Movie : इतिहासातील अनेक प्रेमकथा आपल्याला परिचीत आहेत. इतिहासाच्या पानांमध्ये दडलेली अशीच एक अनोखी प्रेमकथा मराठी रुपेरी पडद्यावर येण्यासाठी सज्ज झाली आहे. 'मुळशी पॅटर्न'च्या माध्यमातून आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकणारा अभिनेता ओम भूतकर (Om Bhutkar) आणि सौंदर्यासोबत अभिनयाचा सुरेख मिलाफ असलेली गुणी अभिनेत्री मोनालिसा बागल (Monalisa Bagal) यांची जोडी 'रावरंभा' (Raavrambha) या सिनेमाच्या माध्यमातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे.
मोनालिसाने 'रावरंभा' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे. पोस्टर शेअर करत तिने लिहिलं आहे की, "श्वास धरा रोखून, तो येतोय उसळत्या घोड्यावर स्वार होऊन, अन् पोलादी तलवारीस धार लावून! 'रावरंभा' 12 मे पासून जवळच्या चित्रपटगृहात." 'रावरंभा'चं मोशन पोस्टर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं असून ते आता या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
'रावरंभा' कधी येणार प्रेक्षकांच्या भेटीला?
'रावरंभा' हा सिनेमा येत्या 12 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. अनुप जगदाळे यांनी या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात छत्रपतींच्या भूमिकेत शंतनू मोघे तर प्रतापराव गुजर यांच्या भूमिकेत अशोक समर्थ दिसणार आहे.
View this post on Instagram
'रावरंभा'च्या पोस्टरमध्ये काय आहे?
'रावरंभा'च्या पोस्टरमध्ये आसमंतात फडकणाऱ्या भगव्या झेंड्याच्या पार्श्वभूमीवर एकमेंकांसोबत दिसणारे 'राव' आणि 'रंभा' दिसत आहेत. तसेच त्यांच्यासोबत बेभान होऊन दौडणारे घोडेस्वारही दिसत आहेत. या आकर्षक पोस्टरमध्ये ओम आणि मोनालिसा यांची छान जुळून आलेली केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. एकमेकांसाठी काहीही करण्याची तडफ त्यात दिसत आहे.
'रावरंभा' या सिनेमाबद्दल बोलताना दिग्दर्शक अनुप जगदाळे म्हणाले की, "इतिहासाच्या पानांमध्ये 'रावरंभा' ही सह्याद्रीच्या कड्याकपाऱ्यांतील एक दुर्लक्षित पण अनोखी प्रेमकहाणी दडली आहे. ही प्रेमकथा नुसतीच प्रेमकथा नाही तर तिला वास्तवाचे भरजरी कोंदण आहे. छत्रपती शिवाजी महाराज, त्यांच्याप्रती आणि स्वराज्याच्या प्रती असलेली निष्ठा, शौर्याची, त्यागाची आणि समर्पणाची किनार या कथेला आहे."
गुरु ठाकूर आणि क्षितीज पटवर्धनने 'रावरंभा' या सिनेमातील गाणी लिहिली आहेत. गेल्या काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित झाले असून हे सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहेत. आता 'रावरंभा' या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या