सव्वा वर्षात 130 गुंडांना तुरुंगात धाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात राष्ट्रवादीच्या नेत्याचं आंदोलन
राष्ट्रवादीच्या वेदप्रकाश आर्य यांचा दावा आहे की पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी त्यांना भेटायला गेलो असता "गेट आउट" म्हणत अपमान केला.

नागपूर : नागपूरची गुन्हेगारी नेहमीच चर्चेचा विषय असतो. त्याच नागपुरात एक पोलीस अधिकारी अवघ्या सव्वा वर्षात 130 गुंडांना तुरुंगात घालत असेल, गुन्हेगारांच्या अनेक टोळ्या उद्ध्वस्त करत त्यांचे इमले (इमारती ) जमीनदोस्त करत असेल आणि त्याच अधिकाऱ्याच्या विरोधात सत्ताधारी राजकारणी वैयक्तिक स्वार्थापायी आंदोलनाला उतरत असेल तर तुम्ही काय म्हणणार. सध्या नागपुरात तसंच घडतंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष वेदप्रकाश आर्य यांनी नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या विरोधात आंदोलन सुरू केले आहे. त्याला कारण ठरले आहे आर्य यांनी एका आरोपीला पाठीशी घालत त्याला थेट राजमाने यांच्या कॅबिनमध्ये नेणे आणि आरोपीला आपल्या समोर पाहून राजमाने यांनी त्याला उद्देशून म्हटलेले "गेट आउट" हे दोन शब्द.
नागपूरच्या संविधान चौकात भगतसिंह, सुभाषचंद्र बोस यांच्या बॅनर पोस्टरसह करण्यात आलेले एक आंदोलन सध्या चांगलेच चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते वेदप्रकाश आर्य यांच्या नेतृत्वात झालेले हे आंदोलन एका पोलीस अधिकाऱ्याच्या विरोधात करण्यात आले. नागपूर पोलीस गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन राजमाने यांनी कॅबिनमध्ये अपमानास्पद वागणूक दिल्याचा आरोप करत वेदप्रकाश आर्य यांनी हे आंदोलन केले. दोन्ही बाजू जाणून घेतल्यानंतर मिळालेल्या माहितीप्रमाणे नागपुरात गाजलेल्या हनी ट्रॅप प्रकरणासह अनेक प्रकरणात नाव आलेल्या आणि ज्यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने उत्पन्नापेक्षा जास्त संपत्ती गोळा केल्याचा ठपका ठेवत चौकशी सुरू केली आहे, अशा आरोपीला सोबत घेऊन वेदप्रकाश आर्य थेट राजमाने यांच्या कॅबिनमध्ये पोहोचले. मी भेटायला येतो आहे असे सांगणाऱ्या आर्य यांनी मी पोलिसांकडून चौकशी होत असलेल्या एका इसमाला सोबत घेऊन येतो आहे अशी कल्पना उपायुक्त राजमाने यांना दिली नव्हती. त्यामुळे ज्याच्या विरोधात आपले पोलीस पथक अनेक गंभीर प्रकरणात चौकशी करत आहेत त्या इसमाला समोर पाहून राजमाने संतापले आणि त्यांनी त्या इसमाला कॅबिनबाहेर जाण्यास सांगितले. नेमकं हाच मुद्दा आर्य यांनी हाताशी धरत गजानन राजमाने यांच्या विरोधात आंदोलनाची मोहीम उघडली. राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेल्या गृह विभागाकडे तक्रारही केली आहे.

वेदप्रकाश आर्य यांचा दावा आहे की पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांनी त्यांना भेटायला गेलो असता "गेट आउट" म्हणत अपमान केला. दरम्यान गजानन राजमाने यांनी आर्य यांचे आरोप फेटाळत त्यांनी "गेट आऊट" हे शब्द त्या आरोपी इसमाबद्दल वापरल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. आता ज्या पोलीस अधिकाऱ्याविरोधात "इगो"च्या लढाईत आंदोलन केले जात आहे. त्याचे काही सत्यही जाणून घेणे गरजेचे आहे. आपल्या आंदोलनाला देशभक्तीची फोडणी देण्यासाठी मोठ्या खुबीने त्यात भगतसिंह, चंद्रशेखर आजाद आणि सुभाषचंद्र बोस यांचे पोस्टर्स आणि घोषणा वापरल्या गेल्या. नागपूरच्या संविधान चौकात अनेक तरुणांनाना सोबत घेत आर्य यांनी हे आंदोलन केले. मात्र, या आंदोलनात आणलेल्या तरुणांचे या आंदोलनाच्या कारणाबद्दलचे ज्ञान ही जाणून घेणे महत्वाचे आहे. जेव्हा एबीपी माझाने त्या तरुणांना तुम्ही कोणाविरोधात आंदोलन करत आहात असे प्रश्न विचारले, तेव्हा त्याची माहिती कोणालाही नव्हती. कोणीतरी आंदोलनाला चला म्हटले म्हणून सोबत आलो असे एका पोलिस अधिकाऱ्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्यांचे म्हणणे होते. काही आंदोलक तर थेट हे आंदोलन तुकाराम मुंढे यांच्यासाठी आहे असे समजून तिथे आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे एका अधिकाऱ्याला दोषी सिद्ध करण्यासाठी तरुणांची दिशाभूल करून हे आंदोलन करण्यात आले का अशी शंका निर्माण झाली आहे.
पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या गुंडांविरोधातल्या 15 महिन्याच्या कालावधीतील कारवाया
- 9 जुलै 2019 ला गुन्हेशाखेचा कारभार स्वीकारल्यानंतर आजवर 130 गुंड तुरुंगात टाकले.
- 61 गुंडाविरोधात ठोस अशी एमपीडीएची कारवाई केली.
- विदर्भातला सर्वात मोठा गुंड आणि अनेक भाजप नेत्यांसह सख्य असलेल्या संतोष आंबेकर विरोधात एकूण 13 गुन्हे दाखल करत त्याच्या टोळीचे कंबरडे मोडले.
- आंबेकर टोळी विरोधात 2 मकोका कारवाई केल्या. आंबेकर टोळीचे 14 आरोपी अटक करत आंबेकरच्या दहशतीचे पर्याय बनलेले त्याचे घर पाडत नागपूरकरांच्या मनातून आंबेकरची दहशत कमी केली.
- राष्ट्रवादी काँग्रेसच्या साहिल सय्यद विरोधात 6 गुन्हे दाखल करत त्याचे आणि त्याच्या टोळीचे सर्व काळे कारनामे समोर आणले, साहिल सय्यदचे अवैध घर पाडले.
- शिवसेनेचा तत्कालीन शहर अध्यक्षाल मंगेश कडवला खंडणी वसूल केल्याप्रकरणी अटक करत ठोस कारवाई केली, त्याचे इतर अनेक प्रकरण उघडकीस आणत खंडणी आणि अवैध सावकारीचे गुन्हे नोंदवले.
- तपन जयस्वाल या भाजपच्या युवा नेत्यावर खंडणी प्रकरणी कारवाई करत त्याचे अवैध सावकारीचे प्रकरण शोधून काढले.
- अनेकांना गंडा घालणाऱ्या प्रीती दासचे खंडणी वसुलीचे प्रकरण समोर आणत अनेकांना न्याय मिळवून दिले.
- अफसर अंडा या गुंडाचे अमली पदार्थ तस्करीचे नेटवर्क उघडकीस आणून मकोका कारवाई केली.
- अशोक बावाजीच्या जुगार अड्डा कारवाई करत जुगाराच्या नेटवर्कला धक्का दिला.
- गोळीबार करूनही कधीच ठोस कारवाई न झालेल्या शेखु टोळीला जेरबंद करतची मकोकाची कारवाई केली.
- 15 पेक्षा जास्त महिलांना अडकवणाऱ्या रोशन शेख टोळीविरोधात मकोका कारवाई केली.
- सुमित चिंतलवार टोळीकडून अनेक बंदुका जप्त करत मकोका लावले.
- करीम लाला या अमली पदार्थ तस्करी करणाऱ्या गुन्हेगाराला जेरबंद करत ठोस कारवाई केली.
- महिलांच्या चेन स्नॅचिंग करणाऱ्या इरानी टोळी विरोधात 50 गुन्हे उघडकीस आणत भक्कम कारवाई केली. परिणामी 2018 या वर्षभरात चेन स्नॅचिंगचे 150 पेक्षा जास्त गुन्हे घडले असताना ते 2020 मध्ये 12 वर आले.
नागपुरात नेहमीच गुन्हेगारीच्या घटना घडतात आणि राज्यभर त्याचा गाजावाजा होतो. त्यावर राजकारण ही केले जाते. मात्र, जेव्हा एक अधिकारी कर्तव्यदक्षतेने नागपुरातील गुन्हेगारीचा कंबरडं मोडण्यासाठी प्रयत्न करतो आहे तेव्हा त्या अधिकाऱ्याविरोधात राजकारण्यांनी फक्त मान अपमानाचा मुद्दा उचलून भाडेपट्टीवर आणलेल्या आंदोलकांना हाताशी धरून आंदोलन करणे दबावतंत्र नाही का? दुर्दैव म्हणजे पोलीस अधिकाऱ्याविरोधात दबाव तंत्राचे हे हत्यार खुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरात उगारले गेले आहे. गृहमंत्र्यांनी त्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.























