(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Raj Thackeray : वाचायला काय आवडतं ते महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, वाचा राज ठाकरेंच्या मुलाखतीमधील दहा महत्त्वाचे मुद्दे
मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी राज ठाकरेंनी काही महत्वाच्या मुद्यांवर भाष्य केलं.
Raj Thackeray : मराठी भाषा गौरव दिनानिमित्त पनवेलमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या मुलाखतीचं आयोजन करण्यात आलं होतं. 'ठाकरे नेमकं काय वाचतात' या विषयावर राज ठाकरेंची मुलाखत झाली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. आपण वाचलं पाहिजे नाहीतर विचारांचा तोकडेपणा येतो. मला व्यंगचित्रामुळं वाचनाची आवड लागल्याचे राज ठाकरे म्हणाले. ठाकरे काय वाचतात असा प्रश्न वितारल्यावर ते म्हणाले की 'ठाकरे चेहरे वाचतात'. राज ठाकरे आपल्या मलाखतीत नेमकं काय म्हणाले? पाहुयात त्यांच्या मुलाखतीमधील दहा महत्वाचे मुद्दे
1) बाळासाहेब ठाकरे यांची फोटो बायोग्राफी करणे माझ्या वडिलांमुळे शक्य झाल्याचे राज ठाकरे म्हणाले. कारण त्यांनी सुरुवातीच्या काळात बाळासाहेबांचे फोटो काढले होते. भरपूर फोटो जमा झाले. त्यानंतर लंडनमध्ये महात्मा गांधीजींचं एक पुस्तक हाती लागले. त्यावरुन बाळासाहेबांचे फोटो बायोग्राफीमध्ये कसे लावायचे याची लिंक लागल्याचे राज ठाकरे म्हणाले.
2) मी झेपेल तेवढेच वाचतो. मला एखादी गोष्ट आवडली तर मी परत परत वाचतो. काय बोललो यापेक्षा काय दिलं हे बाळासाहेब ठाकरे यांनी शिकवल्याचे राज ठाकरे म्हणाले. मला काही द्यायचे असेल तर वाचले पाहिजे, पाहिलं पाहिजे, अनुभवलं पाहिजे असेही ते म्हणाले.
3) महाराष्ट्रातील राजकीय स्थितीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. आत्ताची महाराष्ट्रातली राजकीय स्थिती पाहता मतदारांना काही किंमत आहे असं मला काही वाटतच नाही. तुम्ही फक्त यांचे नोकर आहात. मतदान करा आणि मोकळे व्हा. बाकी आम्ही आमचं काय नाचायचं ते नाचू. असं ठाकरे म्हणाले.
4) छत्रपती शिवरायांचे गडकिल्ले ही महाराजांची स्मारके असल्याचे राज ठाकरे म्हणाले. किती पुतळे बांधणार, काय त्यांची अवस्था आहे. इंदू मिलच्या ठिकाणी जगातील सर्वात मोठे ग्रंथालय उभारायला हवं होतं अशी माझी इच्छा होती. जगभरातील लोकं त्या ठिकाणी आले पाहिजेत. इतकं भव्य ग्रंथालय होणं गरजेचं आहे.
5) मला ठराविक लोकांची चरित्र वाचायला आवडतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, इंदिरा गांधी, सावरकर यांचे जीवन चरित्र वाचायला आवडेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांचे चरित्र वाचायला आवडेत. दादा कोंडके यांचे एकटा जीव हे पुस्तक मी खूप वेळा वाचले आहे. ते पुस्तक वाचायला आवडते असेही राज ठाकरे म्हणाले.
6) राज ठाकरेंनी वाचलं पाहिजे असा प्रश्न जे विचारतात हा विचारणाऱ्यांच्या अज्ञानाचा भाग असल्याचे राज ठाकरे म्हणाले. मी ज्यावेळी यावर चार तुऱ्या टाकतो त्यावेळी हे लोक पॅक होतात असे राज ठाकरे म्हणाले.
7) मी सामना आणि मार्मिक वाचत नाही. सामना घरी येतो. हल्ली वर्तमान पत्रात वाचाव्या अशा बातम्या नसल्याचे राज ठाकरे म्हणाले
8) परदेशात किती चांगले ग्रंथालय उभी केली आहे. आपल्याकडे का तसे होत नाही. परदेशातील बुक शॅापमध्ये बसून वाचायला मिळते. आपल्याकडे हल्ली कॉफी शॅाप उघडली जात आहेत. तिथे पुस्तके सुद्धा ठेवली पाहिजेत
9) भाषा ही तुमची ओळख आहे. मराठी भाषा बोलणारा व्यक्ती आहे ही तुमची ओळख असल्याचे राज ठाकरे म्हणाले.
10) महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे. असा महाराष्ट्र कधीही नव्हता. मी बाळासाहेब ठाकरेंच्या तैलचित्राचे अनावरण करायला विधानभवनात गेलो होतो. त्यावेळी खाली बसलेले अनेकजण होते. त्यावेळी मला कळत नव्हते की कोण कोणत्या पक्षातील आहे.