(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशकात स्वाईन फ्लूचं थैमान, चार दिवसात सहा बळी
सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्या नाशिककरांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे.
नाशिक : नाशकात स्वाईन फ्लूने सध्या चांगलच थैमान घातलं आहे. गेल्या चार दिवसात जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या स्वाईन फ्लू कक्षात उपचार घेणाऱ्या 6 जणांचा स्वाईन फ्लूमुळे मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे सप्टेंबर महिन्यातच तब्बल 21 जण स्वाईन फ्लूचे बळी ठरले आहेत.
सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा स्वाईन फ्लूने बळी गेल्याने नाशिककरांमध्ये यामुळे घबराट पसरली आहे. स्वाईन फ्लूची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढत असून सुस्त आरोग्य यंत्रणा आता खडबडून जागी झाली आहे. आज आरोग्य उपसंचालकांनी विभागातील खाजगी डॉक्टरांसह अन्न व औषध विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावली आणि त्यांना योग्य त्या सूचना दिल्या.
काही दिवसांपासून वातावरणातील बदलामुळे हे प्रमाण वाढल्याच डॉक्टरांकडून सांगण्यात येत आहे. जिल्ह्यात यावर्षी 25,829 लोकांची स्वाईल फ्लूची तपासणी करण्यात आली आहे. त्यापैकी 1050 जणांमध्ये स्वाईन फ्लूची लक्षण दिसून आली होती. या सर्वांना 'टॅमी फ्लू'ची टॅबलेट्स देण्यात आली. नाशिक आरोग्य प्रशासनाकडे सध्या 'टॅमी फ्लू'ची 36 हजार 415 एवढी टॅबलेट्स उपलब्ध आहेत.
अनेकदा खाजगी डॉक्टरांकडून स्वाईन फ्लूचं निदान न झाल्याने त्यांच्यावर उपचार करण्यास विलंब होतो. ग्रामीण भागात योग्य ते उपचार केले जात नाही आणि त्यामुळेच रुग्ण दगावत असल्याचं समोर आलं आहे. याच पार्श्वभूमीवर आज आरोग्य उपसंचालकांनी विभागातील खाजगी डॉक्टरांसह अन्न व औषध विभाग आणि आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावून सर्वांना योग्य सूचना दिल्या.