(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नाशिकमध्ये 'अगंबाई सासूबाई!' 80 वर्षांच्या आजोबांचा 68 वर्षांच्या आजीशी विवाह
आयुष्याच्या उतार वयात दोघे एकटे असल्यानं ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली आणि सिन्नर तालुक्यातील हिवरे गावात वाजत गाजत व आप्त नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा 16 फेब्रुवारीला पार पडला.
शिर्डी: अगंबाई सासूबाई’ ही टीव्ही मालिका सध्या प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. एखाद्या चित्रपटात शोभेल अशी घटना सिन्नर तालुक्यात घडली आहे. सिन्नर तालुक्यात हिवरे गावी 80 वर्षांच्या आजोबांनी 68 वर्षांच्या आजीशी विवाहगाठ बांधली आहे. हा अनोखा विवाह सोहळा पाहण्यासाठी शेकडो वऱ्हाडींनी हजेरी लावली होती. ज्येष्ठ नागरिकांच्या या विवाहसोहळ्यासाठी निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. |पत्रिकेवरील वाक्यं वर्तमानाची जाण करुन देणारी होती.
80 वर्षीय निवृत्ती रुपवते हे सेवा निवृत्त पोस्ट मास्टर आहेत. तर सुमनबाई पवार या 68 वर्षाच्या आहे. या दोघांनी आयुष्याच्या उतार वयात एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि पाहता पाहता हा निर्णय वास्तवात सुद्धा उतरला. निवृत्ती रुपवते याना एक मुलगा मात्र दहा वर्षांपासून तो बेपत्ता तर सुमनबाई याना दोन मुली आहे. आयुष्याच्या उतार वयात दोघे एकटे असल्यानं ओळखीच्या लोकांनी चर्चा घडवून आणली आणि सिन्नर तालुक्यातील हिवरे गावात वाजत गाजत व आप्त नातेवाईकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा 16 फेब्रुवारीला पार पडला. चंद्रकांत पवार यांनी हा विवाह सोहळा जुळवून आणण्यात महत्वाची जबाबदारी उचलली. केवळ प्रोग्रेसिव्ह विचार न करता तो वास्तवात आणणे गरजेचं असल्याच पवार यांनी सांगताना दोन्ही कुटुंबीयांना विश्वासात घेऊन हा निर्णय घेतला असल्याच सांगितलं.
या लग्न सोहळ्याला सुमनबाई यांच्या दोन्ही मुली तर नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते तर लग्नाची रजिस्टर नोंदणी व्हावी यासाठी पत्रिका सुद्धा छापण्यात आल्या. वयोवृध्द नागरिक यांच्याकडे समाजच नव्हे तर अनेकदा कुटुंबीय सुद्धा दुर्लक्ष करतात. यामुळेच वृद्धाश्रमाची संख्या सध्या वाढत असल्याच मत यावेळी पवार यांनी मांडले ज्येष्ठांच्या या विवाहसोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकाही छापण्यात आल्या होत्या. पत्रिकेवरील वाक्ये वर्तमानाची जाण करून देणारी होती. पत्रिकेवर लिहलं होतं.
पत्रिकेत काय लिहले होते ?
|| भवतु सय्य मंगलम्।। आम्ही ज्येष्ठ नागरिक आमच्या जीवनाच्या सायंकाळी परस्परांना आधार देण्यासाठी आणि भविष्यकालीन जीवन समृध्द करण्यासाठी... परस्परांचे स्वप्न, प्रेरणा आणि इच्छापुर्ततेसाठी उभयतांच्या संमतीने विवाहबध्द होत आहोत. तथागत भगवान गौतम बुध्द आणि बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे आशीर्वाद सोबत घेऊनच या अनोख्या नाविन्यपुर्ण जीवनात आम्ही समस्त समाज बांधवांच्या शुभेच्छा आणि समाजमान्यता मिळविण्यासाठी विवाहबद्ध होत आहोत.