एक्स्प्लोर
शिवसेनेला दिलासा, 12 तासांच्या छाननीनंतर दराडेंचा अर्ज वैध
नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज 12 तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला

नाशिक : नाशिक विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये अखेर शिवसेनेला दिलासा मिळाला आहे. सेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा अर्ज 12 तासांच्या छाननीनंतर वैध ठरवण्यात आला. दराडेंच्या अर्जावर राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला होता. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या अर्जाच्या छाननीमध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेला चांगलाच घाम फोडला. शिवसेना उमदेवार नरेंद्र दराडे यांच्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीचे उमेदवार शिवाजी सहाणे यांनी हरकत घेतली होती. दराडे यांच्या पत्नीच्या नावाने येवला नगरपालिकेची दीड लाख रुपयांची थकबाकी आहे. अर्ज भरताना अपूर्ण अर्ज भरला आहे. दराडे यांच्यावर अवलंबून असणाऱ्या वारसाची माहिती असणारा रकाना जोडला नसल्याचा आक्षेप राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेतला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात एकच धावपळ उडली. राज्यमंत्री दादा भुसे यांच्यासह आमदार आणि वरिष्ठ पदाधिकारी शुक्रवारी सकाळी अकरा वाजल्यापासून जिल्हाधिकारी कार्यालयात सुनावणीसाठी हजर होते. निवडणूक निर्णय अधिकारी यांनी आयोगाकडून मार्गदर्शन मागवून सर्वोच्च न्यायालयाच्या केसेसचा अभ्यास करुन अखेर रात्री साडेअकरा वाजता दराडे यांच्या बाजूने कौल दिला. नरेंद्र दराडे यांचा निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दराडे यांच्याकडे थकबाकी नाही, तसंच आपल्यावर कोणीच अवलंबून नसल्याची माहिती त्यांनी अर्जात भरल्याचं शिवसेनेने सांगितलं. राष्ट्रवादीने या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्याची तयारी सुरु केली आहे. या नाट्यमय घडमोडीमुळे निवडणुकीत रंगत आली, हे निश्चित.
आणखी वाचा























