नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेली चिमुरडी चार दिवसांनी सापडली
पोलिसांनी पोस्टर बनवून बस थांबा, जिल्हा रुग्णालय, रिक्षा टॅक्सी आशा सर्वत्र चिटकवून मुलीचा शोध सुरू केला होता. अखेर पोलिसांच्या सतर्कतेन मुलगी सापडली असून अपहरणकर्त्याला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत.
नाशिक : नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयातून अपहरण झालेल्या चिमुरडीचा चार दिवसांनी शोध लागलाय. पहाटेच्या सुमारास मुलीला घेऊन जाणाऱ्या अपहरणकर्त्याला नाशिक पोलिसांच्या रात्रीच्या गस्त घालणाऱ्या पथकाने ताब्यात घेतलं आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात शनिवारी एक अपहरणकर्ता 14 महिन्याच्या चिमुरडीचे अपहरण करून घेऊन जाताना टिपला होता. तेव्हापासून त्याचा शोधासाठी सर्वत्र टीम रवाना झाल्या होत्या.
नाशिक शहर आणि ग्रामीण पोलीस दल त्याचा सर्वत्र शोध घेत होते. चार दिवसांपासून संपूर्ण यंत्रणेची झोप उडाली होती. तर संगिता आणि भोला गौड या दाम्पत्याची पायाखालची जमीनच सरकली होती. गेल्या चार दिवसापसून अन्न पाणी सोडून हे दोघेही सगळीकडे आपल्या चिरमुरीडचा शोध घेत होते. आईच्या डोळ्यातून अश्रू थांबण्याचे नाव घेत नव्हते. पोलिसांनी पोस्टर बनवून बस थांबा, जिल्हा रुग्णालय, रिक्षा टॅक्सी आशा सर्वत्र चिटकवून मुलीचा शोध सुरू केला. अखेर पोलिसांच्या सतर्कतेन मुलगी सापडली असून अपहरणकर्त्याला पोलिसानी बेड्या ठोकल्या आहेत. त्यामुळे यंत्रणेने सुटकेचा निश्वास टाकला तर मुलीचा दुसरा जन्म झाल्याची कुटुंबियांची भावना आहे.
शनिवारी संगीता गौड आपल्या बहिणीच्या प्रसुतीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालायत आल्या होत्या. तेव्हा प्रसूती वॉर्डमध्ये मुलीला आणू नका, असं रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी सांगितलं. त्यामुळे त्यांनी मुलीला वॉर्डच्या बाहेर झोपवले आणि एका अनोळखी व्यक्तीला विश्वसाने मुलीवर लक्ष ठेवायला सांगितले. त्याच व्यक्तीने मुलीचे अपहरण केल्याची माहिती संगीता गौड यांनी एबीपी माझाल दिली आहे. चार दिवसापासून नाशिक पोलीस ठिकठिकाणी मुलीचा सोध घेत होते. अखेर पहाटेच्या सुमारास सुरेश काळे हा अपहरणकर्ता मुलीला घेऊन जात असताना गस्ती पथकाच्या निदर्शनास आला. त्याला हटकले असता त्याने उडवा उडवीचे उत्तर देण्यास सुरुवात केली. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने मुलीचे अपहरण केल्याच कबूल केलं. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत मोलमजुरी करणारा सुरेश काळे मुलीला कुठे घेऊन जात होता. अपहरण करण्यामागचा त्याचा उद्देश काय होता? याबाबत चौकशी केली जात आहे.
जिल्हा रुग्णालयात एक दिवस आधीच सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले होते. त्यामुळे अपहरणकर्ता सीसीटीव्ही तर कैद झाल्याने त्याला शोधणे सोपे झाले. या घटनेनंतर रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयाची सुरक्षा अधिक कडक केली असून नातेवाईकांना पास दिले जाणार आहेत. पासशिवाय या पुढे कोणालाच रुग्णालयात प्रवेश दिला जाणार नसल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. के आर श्रीवास यांनी दिलीय.