Nashik News : नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून ओबीसी आरक्षणाचे जल्लोषात स्वागत
सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिल्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले

नाशिक : ओबीसी आरक्षण मिळाल्यामुळे राष्ट्रवादीच्या वतीने शहरातील राष्ट्रवादी भवनवर जल्लोष करण्यात आला आहे. आमची लढाई सुप्रीम कोर्टासोबत होती आणि ही लढाई आम्ही जिंकलो आहोत. त्यामुळे आमच्यासाठी हा आनंदाचा दिवस असल्याच्या भावना यावेळी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.
गेल्या अनेक वर्षांपासून चा ओबीसी आरक्षणाचा तिढा अखेर सुटला आहे. ओबीसी आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाने आज महत्वाचा निर्णय दिला आहे. बांठिया आयोगाच्या अहवालानुसार निवडणुका घ्याव्यात अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने दिली असून येत्या दोन आठवड्यात निवडणुका जाहीर कराव्यात असेही निर्देश दिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये आता ओबीसींना 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण मिळणार आहे. ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. काही दिवसातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचं बिगूल वाजणार आहे.
दरम्यान सुप्रीम कोर्टाने ओबीसी आरक्षणाबाबत निकाल दिल्यानंतर राज्यभरात जल्लोष करण्यात येत आहे. ओबीसी आरक्षणासाठी छगन भुजबळ यांनी विशेष प्रयत्न केल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे हा विजय त्यांचा असून राज्यातील ओबीसींसाठी हा महत्वाचा दिवस असल्याचे जल्लोष कार्यकर्त्यांनी सांगितले. यावेळी राष्ट्रवादी भवन समोर ढोल ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांनी जल्लोषात ओबीसी आरक्षणाचे स्वागत केले.
दरम्यान आरक्षण जाहीर झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थामधील निवडणुकीतील ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे. कारण, सुप्रीम कोर्टानं आज बांठिया अहवाल मान्य केला असून राज्यातील निवडणुका त्यानुसार घेण्याचे निर्देश दिले आहे. दोन आठवड्यात उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नोटिफाय करण्याचे सुप्रीम कोर्टानेआदेश दिले आहेत. त्यामुळे बांठिया आयोगाच्या अहवालानुसार राज्यात ओबीसी आरक्षणासह निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, गेल्या आठवड्यात स्थगित झालेल्या 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतीमध्ये ओबीसी आरक्षणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
ओबीसींना जे पंचायत राज मधलं आरक्षण आहे हे सामाजिक न्याय हक्काचं आरक्षण आहे. जे मंडळ आयोगाच्या माध्यमातून 73 व्या घटना दुरुस्तीच्या माध्यमातून आरक्षण आहे. त्या आरक्षणाबद्दल सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब केले आहे, त्यामुळे या निर्णयाचं आम्ही स्वागत करत आहोत, असं म्हणत राष्ट्रवादीने जल्लोष साजरा केला आहे.
छगन भुजबळ उद्या नाशिकमध्ये
दरम्यान आज ओबीसी आरक्षणाबाबत महत्वपूर्ण निकाल आल्यानंतर राज्यभरात आनंदाच वातावरण असल्याचे ओबीसी नेते भुजबळ यांनी सांगितले. छगन भुजबळ हे उद्या नाशिक दौऱ्यावर असून अखिल भारतीय समता परिषदेकडून त्यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे.























