Coronavirus | येवल्यातील राजापूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू
नाशिकच्या येवला तालुक्यातील राजापूर गावात अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. एका आठवड्यात एक-एक दिवसांच्या अंतराने सर्वांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
![Coronavirus | येवल्यातील राजापूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू Maharashtra News Five members of the family died due to covid-19 in Rajapur village of Yeola Coronavirus | येवल्यातील राजापूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/04/17/4a0e062c3a91846f65fe2826f9f41a75_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
येवला (नाशिक) : नशिक जिल्ह्यात कोरोनाचा प्रार्दुभाव प्रत्येक गावागावात पोहोचला असून मृतांच्या आकडेवारीतही वाढ झाल्याचं चित्र आहे. त्यातच येवला तालुक्यातील राजापूर गावात एकाच कुटुंबातील पाच जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.
येवला तालुक्यातील राजापूर इथले स्वस्त धान्य दुकानदार अरुण जाधव यांची आई मालनबाई या आजारी असल्याने त्यांना पाहण्यासाठी त्यांच्या दोन बहिणी मुंबई आणि हैदराबाद इथून आल्या होत्या. काही दिवसानंतर त्यांना त्रास होऊ लागल्याने त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेले असता त्यांच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला.
यानंतर त्या घरातील अरुण जाधव यांच्यासह त्यांचा मोठा मुलगा आणि आईलाही त्रास जाणवायला सुरुवात झाली आणि एका आठवड्यात एक-एक दिवसांच्या अंतराने सर्वांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
अरुण जाधव यांचा धाकटा भाऊ हा मुंबईत कामानिमित्त राहतो. तो सुद्धा आईला भेटायला आलेला होता. त्यावेळी त्यालाही कोरोनाची लागण झाली होती. मात्र मालेगाव इथे उपचार घेतल्यानंतर त्याला बरे वाटले. पण घरातील पाच जणांचा मृत्यू झाल्याचं त्याला अद्याप सांगण्यात आलेलं नाही.
एकाच कुटुंबातील पाच जणांच्या मृत्यूमुळे राजापूर गावात हळहळ व्यक्त होत आहे. पती बरोबरच सासरे, आजी सासू आणि दोन आत्ये सासूंचे निधन झाल्याने घरात मालनबाई यांच्या नातसूनेवरच सर्व जबाबदारी येऊन पडली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)