एक्स्प्लोर
प्रत्येक दारावर मुलींच्या नावाची पाटी, येवल्यातील शिक्षकांचा स्तुत्य उपक्रम
येवला (नाशिक) : महिला सबलीकरण, महिला सशक्तीकरण, स्त्री हक्क किंवा एकंदरीतच स्त्रियांच्या हक्कांसदर्भात अनेकजण बोलत असतात, मात्र, येवला तालुक्यातील शिक्षकांनी या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं पाऊल टाकलं आहे. प्रत्येक घराच्या दारांवर मुलीच्या नावाची पाटी लावण्याचा उपक्रम येवल्यातील शाळेने सुरु केला आहे. विशेष म्हणजे गावातील लोकांकडूनही या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतो आहे.
येवला तालुक्यात राहणारे ज्ञानेश्वर पायमोडे यांना स्वत:च्या मुलीने घरावर माझ्या नावाची नेमप्लेट का नाही, असा प्रश्न विचारला आणि त्यांनी मुलीच्या आनंदासाठी स्वत:च्या घराच्या दरवाजावर लावली. येथून त्यांना कल्पना सुचली आणि सहकारी शिक्षक ज्ञानेश्वर बारगळ यांच्या मदतीने त्यांनी गावा गावातील शाळांमध्ये शिकणाऱ्या प्रत्येक मुलीच्या घरावर तिच्या नावाची नेमप्लेट लावण्याचा अनोखा उपक्रम सुरु केला.
येवला तालूक्यातील महालखेडा, भिंगारे या गावांमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांची फेरी काढत प्रत्येक कुटूंबाला मुलीचं महत्त्व पटवून दिले आणि त्या घरावर त्या मुलीच्या नावाची पाटी लावली.
या दोन शिक्षकांनी सुरु केलेल्या या अनोख्या उपक्रमाला शाळेतील इतर शिक्षकांच सहकार्य लाभलं आणि पाहता पाहता अनेक गावांमध्ये प्रत्येक घरांवर मुलीच्या नावाची नेमप्लेट लावून 'लेक वाचवा, लेक शिकवा' असा संदेश देण्याचा प्रयत्न केला.
मुलगीसुद्धा वंशाचा दिवा आहे आणि मुलीच्या नावाची पाटी घरावर लागल्याचा आनंद वाटत असल्याच पालक सांगतात. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची दारं खुली करुन दिल्याने आज अनेक क्षेत्रात महिला या पुरुषांच्या बरोबरीने काम करत आहेत. मात्र आज ही स्त्रीभ्रूण हत्या, हुंडाबळीसारखे प्रकार घडत आहेत. वंशाचा दिवा म्हणून मुलगाच हवा असा अट्टाहास केला जातो आणि मुलीवर अन्याय होतो. ग्रामीण भागातील हे चित्र बदलावे आणि मुलींना त्यांचे स्वातंत्र्य मिळावे, यासाठी हे अनोखे अभियान सुरु करण्यात आल्याच शिक्षक सांगतात.
एकुणच ग्रामीण भागात अशा पद्धतीने चालवल्या जाणाऱ्या उपक्रमाला त्या त्या गावातील ग्रामस्थांची साथ मिळत आहे. आता येवला तालुक्यातील 5 गावांमध्ये घराच्या दरवाजावर मुलींच्या नावाच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement