नाशिकमधील वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीचे मानकरी विनोद बेलगावकर यांच्यावर गुन्हा
नाशिकमधील तीनशे वर्षांपासूनची परंपरा असलेल्या वीर दाजिबा बाशिंग मिरवणुकीचे मानकरी विनोद बेलगावकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाल्याने भाविक आणि हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत.
नाशिक : नाशिकच्या वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीचे मानकरी विनोद बेलगावकर यांच्यावर भद्रकाली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. गुन्ह्याची नोंद झाल्यामुळे वीर दाजीबा यांचे भाविक आणि हिंदू संघटना संतप्त झाल्या आहेत. मिरवणुकीनंतर गुन्हा दाखल झाल्याची एवढ्या वर्षातील नाशिकमधील ही पाहिलीच घटना आहे.
नाशिकमधील तीनशे वर्षांपासूनची ही परंपरा असून धुलिवंदनच्या दिवशी जुने नाशिक परिसरापासून ते रामकुंडापर्यंत वाजत गाजत या वीर दाजिबाची मिरवणूक निघते. वीर दाजिबाचे दर्शन घेण्यासाठी विविध ठिकाणांहून भाविक सहभागी झाले होते. मात्र या मिरवणुकीत पोलिसांनी घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचे उल्लंघन झालं. तसंच परवानगी नसतानाही मिरवणूक काढल्याचा आरोप ठेवत मानकरी विनोद बेलगावकर यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
वीर दाजीबा बाशिंग मिरवणुकीची आख्यायिका
डोक्याला भरजरी वस्त्रे, कानात सोन्याच्या पगड्या, हातात सोन्याचे कडे, पायात जोडा असा वेष ते धारण करत असतात. घरासमोर रांगोळी काढत तसेच ठिकठिकाणी महिलांकडून औक्षण करत, फुलांचा वर्षाव करुन या दाजिबांचे स्वागत केले जाते. विवाह इच्छुक मुला-मुलींचे विवाह जमत नसतील अशांनी वीर दाजिबाला बाशिंग वाहण्याची परंपरा आहे. "हळद लागलेल्या नवरदेवाला मृत्यू आला आणि त्याची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिली. त्यामुळे डोक्यावर देवाचा मुकूट आणि बाशिंग बांधून अंगाला हळद लावून आपल्या पत्नीच्या शोधात नवरदेव फिरतो," अशी या पारंपरिक मिरवणुकीमागची आख्यायिका आहे. वीर दाजीबा नवसाला पावणारे असून त्यांचे दर्शन घेतल्याने सर्व दुःख दूर होऊन मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात असा समज आहे.
दरम्यान पोलिसांच्या या कारवाईनंतर हिंदू संघटना, वीर दाजिबांचे भाविक संतप्त झाले असून आम्ही हिंदूंनी सण आणि उत्सव साजरे करायचेच नाहीत का? असे प्रश्न विचारत आहेत. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ परवानगी असल्याचं सांगतात आणि दुसरीकडे पोलीस गुन्हे दाखल करतात, असे का? यांसारखे प्रश्न भाविक आणि हिंदू संघटना उपस्थित करत आहेत.