एक्स्प्लोर
Advertisement
डेरिंगबाज आजीला सलाम...! नाशिकमध्ये चार वर्षाच्या नातीला बिबट्याच्या तावडीतून वाचवलं
नाशिकमध्ये बिबट्याची दहशत ही नेहमीच अनुभवायला मिळतेय. बुधवारी रात्री घराच्या अंगणात खेळणाऱ्या एका चार वर्षीच्या चिमुरडीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली, मात्र 60 वर्षीय आजीने धैर्य दाखवत नातीला यातून वाचवलं आणि बिबट्याला पिटाळून लावलं.
नाशिक : आजीने दाखविलेल्या धाडसाने चार वर्षाच्या चिमुरडीची बिबट्याच्या तावडीतून सुटका झाली आहे. बिबट्याने झडप घातल्यानंतर आजीने प्रसंगावधान राखत आपल्या नातीचे प्राण तर वाचविलेच पण बिबट्यालाही पिटाळून लावलं. मात्र ह्या घटनेने नाशिकमध्ये बिबट्याची दहशत पुन्हा एकदा अधोरेखित झालीय.
आठ दिवसांपूर्वी नाशिकच्या कॉलेजरोड इंदिरानगर परिसरात नागरिकांना जखमी करून धुमाकूळ घालणारा बिबट्या अजून अद्याप सापडला नाही. बिबट्यासाठी खोडेमळ्यात पिंजरा लावण्यात आला होता. मात्र बिबट्या तिकडे फिरकलाच नाही. त्याचा शोध घेत असतानाच दोन दिवसांनीच पाथरडी गौळणे शिवारात बिबट्याचा बछडा आढळून आला. त्याच्या मादीचा शोध लागत नाही, तोच सुरगणा तालुक्यात शिकारीच्या शोधात असणारा बिबट्या एका विहिरीत जाऊन पडला.
ही घटना ताजी असतानाच नाशिक तालुक्यातील शेवगे दारणा गावात बुधवारी रात्री घराच्या अंगणात खेळणाऱ्या एका चार वर्षीच्या चिमुरडीवर दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घातली. बिबट्या चिमुरडीला जबड्यात पकडणार तोच तिथे उभ्या असणाऱ्या 60 वर्षीय आजीबाईने बिबट्याच्या दिशेने चाल केली आणि मोठ्या शिताफिने त्याच्या तावडीतून आपली नात समृद्धीची सुटका केली. घरचा दरवाजा उघडून तिला अक्षरक्ष: घरात फेकले आणि बिबट्याला पिटाळून लावले. हा घटनाक्रम अवघ्या काही सेकंदाचा होता. मात्र या काळात साक्षात मृत्यूला समोर बघितलं. हा अनुभव सांगताना बिबट्या समोर धाडस दाखविणाऱ्या आजीच्या मायेचा बांध फुटला.
शेड्युल 1 मध्ये मोडणाऱ्या बिबट्याने आपला अधिवास बदलला आहे. स्वतःच्या जीवनशैलीत बदल केलाय. त्यामुळेच जंगलात साम्राज्य गाजविणाऱ्या बिबट्याची शहरात दहशत बघायला मिळत आहे.
जंगलं हळूहळू उध्वस्त होवू लागल्याने भक्ष्याचा शोध घेत बिबटे मानवी वस्तूकडे येवू लागले आहेत. नाशिक शहराच्या चारही बाजूला खेडी, डोंगररांगा दाट झाडी असल्यानं लपायला जागा आणि सहज शिकार मिळत असल्याने इथे मानवी वस्तीत बिबट्याचा वावर वाढला आहे. गेल्या 5 ते 6 महिन्यात नाशिक जिल्ह्यात बिबट्याने हल्ला केल्याच्या साधारणपणे 20 घटना घडल्या असून यात दोघा चिमुरड्यांचा जीव देखील गेला आहे.
शेवगे दारणा भागात उसाची शेती आहे. या आधीही तिथे बिबट्याने दर्शन दिलं आहे. इथं आता पिंजरा लावण्याची स्थानिकांची मागणी आहे. तर नागरिकांनी ऊस लावताना घराजवळ लावू नये, लहान मुलांना अंधारात बाहेर सोडू नये, घराला कुंपण घालून अंगणात पुरेसा उजेड ठेवावा, असं आवाहन वनविभागाने केलं आहे.
एखाद्या गावात पिंजरा लावायचा असला तरी देखील अनेक कागदी घोडे नाचवले जातात. त्यामुळे मागणी होऊनही पिंजरा लावण्यात वनविभाकडून टाळाटाळ होते. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांनी अधिक सजग राहणं गरजेचं आहे. कारण प्रत्येक वेळी बिबट्यावर झडप मारायला समृद्धीच्या आजीसारखी आजीबाई असेलच याची खात्री नाही.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
सोलापूर
भविष्य
Advertisement