नाशिक : शहरासह जिल्ह्याला जोरदार अवकाळी पावसाने (Nashik Unseasonal Rain) झोडपले, गुरुवारी रात्रीपासून विविध भागात पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाले. तर जिल्ह्यात पिकांचे नुकसान झाले असून अनेक ठिकाणी द्राक्षबागा आडव्या झाल्या. शेतकऱ्यांची शेतातील पिके वाचवण्यासाठी धावपळ उडाली. या अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ नुकसानीची पाहणी करून भरपाई देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.
शुक्रवारी नाशिक शहरातील नाशिकरोड, पंचवटी, सिडको, सातपूर भागात सायंकाळी जोरदार हजेरी लावली. ग्रामीण भागात आधीच झालेल्या अवकाळी पावसामुळे कांदा, मका पिकांचे नुकसान झाले होते. त्यात आता रब्बी हंगामातील कांदा लागवडीसाठी शेतकऱ्यांनी महागड्या दराने बियाणे खरेदी करून कांदा रोप टाकले आहे. या अवकाळी पावसाने कांदा रोप खराब होऊन नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
34 मिलिमीटर पावसाची नोंद
शिलापूर परिसरात काल मध्यरात्री अचानक आकाशात ढग दाटून आले व अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची दाणादाण उडवून दिली. त्यात फुलरा अवस्थेतील द्राक्षबागांचे अतोनात नुकसान होण्याचा अंदाज द्राक्ष बागायतदारांनी व्यक्त केला आहे. माडसांगवी, शिलापूर, ओढा, लाखलगाव व सिद्ध पिंपरी परिसरात 34 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. द्राक्ष उत्पादन घेण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. दोन-तीन दिवसांपासून सतत ढगाळ हवामान व काल अचानक अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. अर्ली छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर ढगाळ हवामानामुळे घुरी करपा व डावण्यासारख्या रोगांना आमंत्रण मिळत आहे.
महागड्या औषधांच्या फवारणीची वेळ
हवामान खात्याचा अंदाज खरा ठरत असल्याने द्राक्ष घडांची गळ होण्याची दाट शक्यता आहे. ते थांबविण्याची साठी महागड्या औषधांच्या फवारण्या कराव्या लागत असून, त्याचा अतिरिक्त खर्च शेतकऱ्यांना सध्या सोसावा लागत आहे. त्याचप्रमाणे पाऊस मोठ्या प्रमाणात पडल्याने शेतात पाणी साचून जमिनीत ओलावा टिकून राहत असल्याने शेतमजुरांना कांदा लागवड करताना अडचणी येत आहेत.
विद्युत पुरवठा खंडित
वडाळा परिसरात काल झालेल्या अवकाळी पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. सकाळपासूनच आभाळाचे वातावरण होते. संध्याकाळच्या सुमारास शहरात पावसाची सुरुवात झाली, वडाळा परिसरातील साईनाथनगर, विनयनगर, खोडेनगर, भारतनगर, बडाळा रोडसह नागजी परिसरात अवकाळी दणकेबाज पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यात काही ठिकाणी संपूर्णपणे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे नागरिकांना मनस्ताप झाला होता.
इतर महत्त्वाच्या बातम्या