मुंबई : राज्यात महायुतीचं (Mahayuti) सरकार स्थापन झालं आहे. या नव्या सरकारमध्ये राज्याचा कारभार देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडे आला आहे. म्हणजेच देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रि‍पदी विराजमान झाले आहेत. तर एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे उपमुख्यमंत्री म्हणून काम करतील. दरम्यान, निवडणुकीत महायुतीने लाडकी बहीण योजनेचा (Ladki Bahin Yojana) लाभ 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यात येईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हे पैसे नेमके कधी मिळणार? असे लाभार्थी महिलांकडून विचारला जात होते. यावरच देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर भाष्य केले आहे. आगामी अर्थसंकल्पात आम्ही त्यावर विचार करू, असं फडणवीस यांनी सांगितलंय. 


महिलांना मिळणार 2100 रुपये


देवंद्र फडणवीस यांनी 5 डिसेंबर रोजी मुंबईत आझाद मैदानावर मुख्यमंत्रि‍पदाची शपथ घेतली. त्यानंतर मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी त्यांना लाडकी बहीण योजनेअंतर्गत वाढीव हप्ता कधी मिळणार? असे त्यांना विचारण्यात आले. यावर बोलताना "सर्वांत महत्त्वाचं म्हणजे आम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरूच ठेवणार आहेत. तसेच महिलांना मिळणारा लाभ 2100 रुपये करणार आहोत. आता अर्थसंकल्पाच्या वेळी आम्ही त्याचा विचार करू. शेवटी आपले आर्थिक योग्य प्रकारे चॅनेलाईज झाल्यानंतरच आपल्याला ते करता येईल, असे फडणवीस यांनी सांगितले. 


 अर्जांची छाननी केली जाणार


 तसेच, महिलांना 2100 रुपये मिळणार हे नक्की आहे. आम्ही जी आश्वासनं दिली त्या पूर्ण करणार आहोत. ही आश्वासनं पूर्ण करण्यासाठी ज्या व्यवस्था उभ्या कराव्या लागतील, त्या आम्ही आधी करू. छाणनीबद्दल बोलायचं झालं तर निकषाच्या आत ज्या महिलांना लाभ मिळत असेल, त्यांना लाभ मिळेलच. पण काही महिलांना निकषाच्या बाहेर राहूनही लाभ मिळत आहे, अशा तक्रारी आलेल्या आहेत. तुम्हाला कल्पना असेल की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा शेतकरी सन्मान योजना चालू केली होती, तेव्हा पहिल्यांदा मोठ्या शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळाला होता, असे समोर आले होते. त्यानंतर काही शेतकऱ्यांनी स्वत: समोर येऊन आम्ही निकषात येत नाहीत, असे सांगितले होते. त्यानंतर ती योजना स्थिर झाली. अशाच पद्धतीने लाडकी बहीण योजनेत काही महिला निकषाच्या बाहेर असतील तर त्याचा पुनर्विचार होईल. या योजनेचा सरसकट पुनर्विचार करण्याचा कोणताही विचार नाही, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. 


दरम्यान,  फडणवीस यांच्या स्पष्टीकरणानंतर राज्यात लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभार्थी महिलांना आगामी अर्थसंकल्पानंतरच वाढीव पैशांचा लाभ मिळणार आहे, हे फडणवीस यांच्या माहितीनंतर स्पष्ट झाले आहे. तसेच निकषाच्या बाहेर असलेल्या महिलांची नावेही रद्द केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता या योजनेसंदर्भात नेमके काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.  


हेही वाचा :


आधी शरद पवारांचा आमदार, आता नेत्यानंच गाठला सागर बंगला; हर्षवर्धन पाटलांकडून फडणवीसांचं अभिनंदन


नियोजनाचा ढिसाळपणा झाला होता; शपथविधी सोहळ्यानंतर 3 तासांतच शिवसेना शिंदे गटाची नाराजी उघड


Eknath Shinde : आता मी DCM आहे, डेडीकेटेड टू कॉमन मॅन, 24 बाय 7 काम करणार, देवेंद्रजींना पूर्ण सहकार्य देणार : एकनाथ शिंदे