Weather Update: बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा तमिळनाडूसह दक्षिणेतील राज्यांना फटका बसला असून कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत आहे. परिणामी महाराष्ट्रात पुढील ३ दिवस  हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं सांगितलंय. राज्यात सध्या तापमान घसरल्याचं दिसत असताना आता चक्रीवादळामुळे गारठा कमी होऊन ढगाळ वातावरण आणि पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 3 व 4 डिसेंबरदरम्यान कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना यलो अलर्टही देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी हलक्या सरींची शक्यता असल्याचा अंदाज IMD नं वर्तवलाय.


कोकण मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज


भारतीय हवामान केंद्राच्या प्रादेशिक केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार, तळ कोकण व मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांना पुढील ३ दिवस हलक्या ते मध्यम सरींच्या पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात आलेल्या फेंगल चक्रीवादळाचा हा परिणाम असल्याचं सांगण्यात येत आहे. मंगळवार ३ डिसेंबरला तळकोकणातील सिंधूदुर्ग, कोल्हापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला असून बुधवारी सिंधूदुर्ग, रत्नागिरी, सातारा, कोल्हापुरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सोलापूर, सांगली, तसेच मराठवाड्यातील धाराशिव, लातूर नांदेड जिल्ह्यातही हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.




तापमान वाढणार


बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचा पट्टा आता वायव्येकडे सरकत असल्यानं महाराष्ट्रात सध्या असणारी कडाक्याची थंडी ओसरणार असून तापमानाचा टक्का वाढणार आहे. वातावरण दमट व ढगाळ राहणार असून कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यात हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.  ‘फेंगल’ चक्रीवादळाने तमिळनाडूच्या किनारपट्टीला धडक दिल्यानंतर पुद्दुचेरी, कुड्डालोर आणि विल्लुपूरम् यांच्या शेजारी भागात अल्प दाबाचे क्षेत्र निर्माण झाले. हे चक्रीवादळ हळूहळू पश्‍चिमेकडे सरकेल आणि नंतर त्याची तीव्रता न्यून होईल, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली होती.  उत्तर भारतातून संपूर्ण नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्रात थंडी घेऊन येणारे थंड व कोरड्या उत्तरी वाऱ्यांना, बं उपसागरातून 'फिंजल' चक्रीवादळाच्या वाऱ्यांना पूर्वे दिशेकडून  लोटलेल्या आर्द्रतायुक्त वाऱ्यामुळे अटकाव केला गेल्यानं व दमटपणा काहीसा वाढण्याची शक्यता आहे.


आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले


‘फेंगल’ चक्रीवादळाचा कोकणातही परिमाण जाणवत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार दक्षिण कोकणात ३ ते ६ डिसेंबर दरम्यान पाऊस पाडण्याची शक्यता आहे. सध्या ‘फेंगल’ चक्रीवादळामुळे हवामानात बदल होऊन दमट हवामान झालं आहे. तर दोन दिवसापूर्वी तापामनात कमालीची घट झाली होती. मात्र आता तापमानात वाढ होत असल्याने तळकोकणातून थंडी गायब झाली आहे. ऐन हिवाळ्यात तापमानात वाढ होऊन दमट वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे कोकणासह गोव्यात देखील पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.पावसाचा अंदाज असल्याने आंबा, काजू उत्पादक शेतकरी धास्तावले आहेत.