Sudhakar Badgujar and Ganesh Gite : स्थानिक आमदारांच्या विरोधानंतरही सुधाकर बडगुजर, गणेश गीतेंसाठी भाजपकडून रेड कार्पेट, उद्या प्रवेशाची शक्यता, जाणून घ्या संपूर्ण राज'कारण'
Sudhakar Badgujar and Ganesh Gite : भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांचा विरोध डावलून सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे.

Sudhakar Badgujar and Ganesh Gite : भारतीय जनता पार्टीच्या (BJP) स्थानिक आमदार आणि कार्यकर्त्यांचा विरोध डावलून शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी झालेल्या सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) आणि विधानसभा निवडणुकीत भाजपच्या आमदाराला आव्हान देणाऱ्या गणेश गीते (Ganesh Gite) यांचा भाजपमध्ये प्रवेश निश्चित झाला आहे. उद्यालाच दोघांचाही प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून आगामी महापालिका निवडणूक (Municipal elections) आणि कुंभमेळ्याच्या (Kumbh Mela 2027) पार्श्वभूमीवर प्रदेश पातळीवरून रेड कार्पेट टाकले जात आहे.
गल्लीपासून दिल्लीपर्यंत शत प्रतिशत भाजपचा नारा देण्याऱ्या भाजपात पुन्हा एकदा इनकमिंग होणार आहे. पक्ष वाढविण्यासाठी आपल्याच पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचा विरोध, नाराजी झुगारून प्रदेश पातळीवरून इतर पक्षातील नेत्यांसाठी पायघड्या टाकल्या जात आहेत. यात शिवसेना ठाकरे गटातून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांचे सर्वात मोठे नाव आहे. सुधाकर बडगुजर यांनी भाजपच्या आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढली होती. त्यात त्यांचा पराभव झाला.
विधानसभेच्या आधीपासूनच बडगुजर टार्गेट
निवडणुकीच्या काही दिवस आधीपासूनच भाजपनेच बडगुजर यांच्यावर गंभीर आरोप त्यांना टार्गेट करायला सुरुवात केली होती. मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्तासोबत पार्टी करत नाचतानाचा बडगुजर यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. विधीमंडळात भाजप आमदार नितेश राणे यांनी ते फोटो आणि व्हिडीओ दाखवून बडगुजर यांच्यावर जोरदार प्रहार केला होता. याच दरम्यान, बडगुजर हे महापालिकामध्ये नगरसेवक असतानाच स्वतःच्या कंपनीला कामे देत फायदा करून दिल्याचा आरोप करत त्यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माध्यमातून चौकशी सुरू झाली होतो.
बडगुजर निवडणूक हारले अन्...
तर एका गोळीबाराच्या प्रकरणात बडगुजर यांच्या मुलावर गुन्हा दाखल करून मोक्काअंतर्गत कारवाई सुरू करण्यात आली होती. बडगुजर निवडणूक हारले आणि त्यांच्या विरोधात आवळण्यात आलेला कारवाईचा फास सैल झाला. ज्यावेळी कारवाई होत होती, त्यावेळी बडगुजर यांनी ठाकरे गटाच्या राज्यस्तरीय शिबिरातून आपली खदखद व्यक्त केली होती. आता तर बडगुजर थेट भाजपमध्ये प्रवेश करत असल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली आहे.
गणेश गिते यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार
भाजप आमदर सीमा हिरे आणि पक्षातील स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक यांनी विरोध केला. मात्र तो डावलून पक्षातून बडगुजर यांना पायघड्या टाकल्या जात आहे. जी परिस्थिती नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाची तशीच परिस्थिती नाशिक पूर्व विधानसभा मतदारसंघात आहे. भाजपचे माजी स्थायी समिती सभापती गणेश गीते यांनी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार राहुल ढिकले यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निवडणूक लढवली होती. दोन्ही गटात दोन ते तीन वेळा हाणामारीच्या घटना देखील घडल्या होत्या. त्यानंतर आता गणेश गिते यांचाही भाजपमध्ये प्रवेश होणार आहे.
भाजपकडून स्वबळाची चाचपणी
आगामी महापालिका निवडणूक आणि मेळ्याच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये जोरदार इनकमिंग केले जात आहे. भाजपचे नेते आगामी महापालिका निवडणूक महायुतीत लढणार असल्याचे दावे करत असले तरीही भाजपकडून स्वबळाची चाचपणी केली जात आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर एकहाती सत्ता असावी, महायुतीत जरी असलो तरीही भाजपचा वरचष्मा असावा, यासाठी इतर पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात आहे. नाशिकच्या राजकारणात गिरीश महाजन यांचा शब्द अंतिम मानला जातो. त्यामुळे गिरीश महाजन यांच्या माध्यमातूनच बडगुजर आणि गीते यांचे प्रवेश होणार आहेत.
गणेश गीते गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय
सुधाकर बडगुजर वादग्रस्त जरी असले तरीही अभ्यासू नगरसेवक म्हणून ओळखले जातात. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचे ते निकटवर्तीय होते. संजय राऊत यांच्याकडे नाशिकसह उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी असल्याने बडगुजर यांना पक्षात स्थान देऊन संजय राऊत यांना धक्का देणे, तसेच उबाठा गटाला खिळखिळं करण्याचे भाजपचे मनसुबे असल्याचे बोलले जात आहे. बडगुजर याना पक्षातून विरोध होत असला तरीही स्वतःबरोबर चार प्रभागाचे पॅनल निवडून आणण्याची त्यांची क्षमता आहे. तर दुसरीकडे गणेश गीते हे गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय आहेत. गिरीश महाजन यांच्यामुळेच गणेश गीते यांना एकदा नाही तर दोन वेळा मनपाच्या स्थायी समिती सभापतीपदाची खुर्ची मिळाली होती. गणेश गीते यांच्या कारकिर्दीत झालेले भूसंपादनचे विषय वादग्रस्त ठरले होते. मात्र, तरीही गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने गणेश गीते यांचाही पुन्हा पक्षात प्रवेश होणार आहे. या दोन्ही नेत्यांबरोबर त्यांचे इतरही समर्थक शक्ती प्रदर्शन करत पक्षात प्रवेश करणार आहे.
उद्या प्रवेशाची शक्यता
सुधाकर बडगुजर आणि गणेश गीते यांचा पक्षातील प्रवेश निश्चित आहे. येत्या आठ दिवसात प्रवेश होणार असल्याचे पक्षाकडून सांगितले जात असले तरीही उद्याच मुबंईत प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. मात्र, या प्रवेशाच्या माध्यमातून स्थानिक लोकप्रतिनिधींमधील अस्वस्थता वाढली आहे. आगामी मनपा निवडणूक जिंकण्यासाठी प्रवेश होत असले तरीही दोन गटातील संघर्ष भाजपची भविष्यात डोकेदुखी वाढविण्याची चिन्ह दिसत आहेत.
आणखी वाचा























