Goda Mahaarti : दोन महाआरत्यांनी गोदाकाठ दुमदुमला; गंगा-शरयूच्या धर्तीवर गोदावरीची नियमित आरती होणार
Nashik News : पुरोहित संघ आणि रामतीर्थ समिती या दोघांमध्ये गोदावरीची आरती कोणी करावी यावरून वाद सुरू होते, हा वाद मिटला नसल्याने दोन स्वतंत्र महाआरती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
Nashik Goda Mahaarti नाशिक : रामतीर्थ गोदावरी समितीतर्फे (Ramtirth Godavari Samiti) आज दुतोंड्या मारूतीजवळ सकाळी ११ ते १२ या वेळेत विविध मान्यवरांच्या हस्ते गंगा गोदावरीपूजन करण्यात आले. तसेच सायंकाळी 5.30 वाजता गंगा गोदावरीची महाआरती (Goda Mahaarti) करण्यात आली.
गेल्या काही दिवसांपासून पुरोहित संघ (Purohit Sangh) आणि रामतीर्थ समिती या दोघांमध्ये गोदावरीची आरती कोणी करावी यावरून वाद सुरू होते, हा वाद मिटला नसल्याने पुरोहित संघ आणि रामतीर्थ गोदावरी समिती दोघांनी वेगवेगळी आरती करण्याचा निर्णय घेतला. काल पुरोहित संघातर्फे गोदावरीची महाआरती करण्यात आली होती. आजपासून दोन स्वतंत्र आरती होणार आहेत.
पुरोहित संघाकडूनही गोदावरीची महाआरती
दरम्यान, सियावर रामचंद्र की जय..., जय श्रीराम... जय जय श्रीराम... असा रामनामाचा गजर करीत व दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा..., असे दत्त स्मरण करून रविवारी सायंकाळी पुरोहित संघाकडून गोदावरीची महाआरती करण्यात आली. यावेळी तीनही आखाड्यांचे साधू, महंतांसह विविध मठ, मंदिरांचे प्रमुख व हजारो नाशिककर उपस्थित होते. गोदाआरती करिता ५ स्टेज उभारण्यात आले होते. या स्टेजवरील विशेष पोशाख धारण केलेले व उज्जैन, वाराणसी-काशी, हरिद्वार येथून आलेले तीर्थ पुरोहित यांच्याद्वारे ही गोदावरी महाआरती करण्यात आली. आज सोमवारी देखील पुरोहित संघाकडून रामकुंड येथे महाआरती करण्यात आली.
डमरू वादन, शंखनाद ठरले भाविकांचे आकर्षण
तसेच पुरोहितांकडून धूप आरती, दीप आरती करून गोदावरी नदीला महानैवेद्य अर्पण करण्यात आला. त्यानंतर मंत्र पुष्पांजली आरती करण्यात आली. यावेळी डमरू वादन व शंखनाद भाविकांचे आकर्षण ठरले होते. सुरुवातीला उपस्थित साधू, संत व महंत यांच्याहस्ते वेद मंत्रोच्चारात गोदापूजन करण्यात आले.
गोदा आरतीसाठी 11 कोटींचा निधी
दरम्यान, वाराणशी, हृषिकेश व हरिद्वारच्या जगप्रसिद्ध गंगा आरतीप्रमाणेच दक्षिण काशी अशी ओळख असलेल्या आणि श्रीरामांच्या वास्तव्याने पुनित झालेल्या नाशिक येथील पवित्र गोदावरी नदीच्या आरतीचा देखील कायमस्वरूपी उपक्रम सुरू करण्याची संकल्पना सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी मांडली होती. या 'गोदा आरती' उपक्रमाच्या पायाभूत सुविधांसाठी शासनाकडून 11 कोटी 77 लाख रुपयांचा निधी सांस्कृतिक खात्यामार्फत जिल्हा प्रशासनाला वितरित करण्यात आला. गोदा आरतीसाठी निधी उपलब्ध झाल्याने अकरा प्लॅटफार्म तयार करणे, भाविकांसाठी गॅलरी, आदी कामे वेगाने करण्यात येतील, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
आणखी वाचा
Shiv Jayanti 2024 : 'छत्रपती शिवाजी महाराज अखंड हिंदुस्थानचे मानबिंदू'; छगन भुजबळांचे प्रतिपादन