2024 ला मोदींना पायउतार करा अन् ही व्यवस्था बदला, प्रकाश आंबेडकरांचे पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र
नाशिकमध्ये धम्म मेळाव्यात प्रकाश आंबेडकर बौद्ध अनुयायांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला.

Prakash Ambedkar Speech: देशाचा पंतप्रधान निवडण्याचा अधिकार आपला नाही, मात्र आपल्याला खासदार निवडून देण्याचा अधिकार आहे. निवडून गेलेल्याने पंतप्रधान ठरवायचा ही व्यवस्था आहे. आणि हीच व्यवस्था आता बदलायला हवी. व्यवस्थेचा भाग म्हणून खासदार निवडण्याचं काम आपलं असल्याचे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
नाशिकमध्ये धम्म मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रकाश आंबेडकर बौद्ध अनुयायांना संबोधित केले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींसह राष्ट्रवादी आणि काँग्रेसवर हल्लाबोल केला. ते यावेळी म्हणाले, घटनेने दिलेले व्यक्ती स्वातंत्र्य आता राहणार नाही, कारण आता नवीन कायदा येत आहे. या देशात आंतरधर्मीय- आंतरजातीय लग्न समाजाने स्वीकारले आहेत. मात्र विकृती समाजात आहे, ती नाकारता येणार नाही. पण याला धरून शासन आता सामाजिक कायदा, त्या संबंधित कायदा आता गठीत होत आहे.
सध्या देशात पंतप्रधानांच्या तोडीचा माणूसच नाही. त्यामुळेच दुर्दैवाने आपण सगळे त्याला बळी पडत आहोत. आपल्यावर बिंबवले जात आहे की पंतप्रधान पदाचा उमेदवार दुसरा नाही, आपल्या मेंदूचा ताबा घेतला जातोय. आता खासदार नका निवडू, आता पंतप्रधान निवडा. उद्या दुसरा कोणी आला, तर त्याला पंतप्रधान म्हणून निवडून देणार का? या देशात उतरंडीची व्यवस्था आहे, तो पर्यंत न्हावी, कुंभार, चांभार यांना मत देणार नाही. त्यामुळे तुमची पंतप्रधान होण्याची कायमची संधी गेली. खासदाराला निवडण्याचा अधिकार काढून घेतला जातोय. आणि तुम्हाला बंदिस्त करण्याचं काम केलं जातंय. म्हणूनच आरएसएस संविधान बदलण्याची भाषा करत असल्याचे ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले, कुठल्याही पक्षाचा प्रमुख ईडीच्या चौकशीत आहेत. राहुल गांधींना पाठीमागे उभं राहायला लावलं आणि मागे नाही राहिला तर जेलमध्ये टाकण्याची भाषा केली जाते. मग त्याला उभं राहावंच लागेल. मी सांगेल तसं नाचा. नाही तर जेलचे दरवाजे खुले आहे. हा लढा सर्वांना लढावा लागेल. राजकीय व्यक्ती लढे लढतील असं नाही. जनतेला आता लढावं लागेल, हा लढा पेटवून ठेवावा लागेल, असं आवाहन त्यांनी केले.
नरेंद्र मोदींवर टीकास्त्र...
नरेंद्र मोदींना चोर म्हणत प्रकाश आंबेडकर म्हणाले की, 2014 ला सत्ता बदलात सगळ्यात मोठा हात मोहन भागवत आणि नरेंद्र मोदी यांचा आहे. नोटबंदी केल्यानंतर आता नोटा रद्द केल्याची केस चालू झाली. कोर्टाने सांगितले की पंतप्रधानांपेक्षा जास्त आम्हाला अधिकार आहे. एखादी नोट चुरगळली तर कोण बदलतं तर रिझर्व्ह बँक बदलते, म्हणून पंतप्रधानांना जावं लागण्याची शक्यता आहे. पंतप्रधान जरी असला तरी त्याला कायदा असतो. रिझर्व्ह बँकेला सांगून नोटा बदलाव्या लागतात आणि तोच मुद्दा सुप्रीम कोर्टने घेतला. नोटा बदलण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला असा सवाल उपस्थित होत आहे.
2024 च्या तयारीला लागा...
2024 च्या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. त्यामुळे आता ज्याला मोदींना जेलमध्ये बघायचं असेल त्यांनी कामाला लागा. 2024 ला मोदी विरोधी सरकार सत्तेत येईल, कामाला लागा. त्यामुळे हे जर बदलायचं असेल तर 2024 आपल्या हातात आहे. एक तर आपण हारु किंवा ते हरतील, असा कडक इशारा यावेळी त्यांनी दिला.
चीनला एवढं जवळ का करत आहेत?
मोदी सरकारवर टीका करताना आंबेडकर म्हणाले की, मोदी सरकारने राफेलमध्ये पैसे खाल्ले, पूर्णपणे खाल्ले हे आम्ही म्हणत नाही. कंपनीने ऑडिटमध्ये लिहिले आहे, मिडल मॅनने पैसे घेतले. तर दुसरीकडे 56 इंचाची छाती चायनामध्ये 14 इंचाची होते. 2500 चौमी एरिया पुन्हा चायनाने घेतला आहे. मोदी आणि चायनाचं काय प्रेम आहे माहीत नाही, असा सवाल त्यांनी उपस्थित केला
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
