Pahalgam Terror Attack : माहेर पाकिस्तानात अन् सासर भारतात, 25 वर्षांपासून सहा महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य; पाकड्यांना चले जावचे आदेश दिल्यानंतर सुनांपुढे पेच, पुढे काय होणार?
Pahalgam Terror Attack : पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहेत.

Pahalgam Terror Attack : काश्मीरच्या पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी 26 निष्पाप पर्यटकांची हत्या केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने कठोर निर्णय घेत भारतात वास्तव्यास असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 48 तासांत देश सोडण्याचे आदेश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हा प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, नाशिक शहरात पाकिस्तानमधील माहेर असलेल्या आणि सध्या विवाहानंतर येथे वास्तव्य करणाऱ्या सहा महिला राहत आहेत. या महिलांकडे दीर्घकालीन व्हिसा (LTV – Long Term Visa) असला तरी, केंद्र सरकारच्या निर्णयामुळे त्यांनाही देश सोडावा लागू शकतो.
25 वर्षांपासून सहा पाकिस्तानी महिलांचं नाशिकमध्ये वास्तव्य
केंद्र सरकार व गृह मंत्रालयाकडून पोलीस आयुक्तालय व पोलीस अधीक्षकांना प्राप्त झालेल्या सूचनांच्या आधारे केलेल्या आढाव्यानुसार, नाशिक शहरात सहा पाकिस्तानी महिलांची नोंद आहे. त्या मागील 20 ते 25 वर्षांपासून नाशिकमध्ये वास्तव्यास आहेत आणि विवाहानंतर आपल्या कुटुंबियांसोबत राहतात. या पाकिस्तानी महिला नात्यांतून भारतात आल्या असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पुढे काय होणार?
या महिलांना देश सोडावा लागणार की नाही, यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नाही. मात्र, त्यांच्या दीर्घकाळच्या वास्तव्यासोबतच त्यांचे वर्तन, कायद्याचे पालन आदी गोष्टी लक्षात घेता, त्यांनी केंद्र सरकारकडे परवानगीसाठी एफआरओ (Foreigners Registration Office) मार्फत अर्ज केल्यास, त्यांचा व्हिसा रद्द न करता नूतनीकरणाचा निर्णय घेतला जाऊ शकतो. यासाठी स्थानिक पोलिस व जिल्हा प्रशासनाची शिफारस महत्त्वाची ठरते. आता या प्रकरणात नेमकं काय होणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
नियम काय सांगतो?
पाकिस्तानातील नागरिक भारतात वास्तव्य करु इच्छित असल्यास, त्यांच्या बाबतीत पाकिस्तानच्या दूतावासामार्फत भारत सरकारकडे अर्ज केला जातो. त्यानंतर दिल्लीतील फॉरेन रजिस्ट्रेशन ऑफिस (FRO) मध्ये तपासणी करून त्यांना दीर्घकालीन व्हिसा दिला जातो. या प्रक्रियेत स्थानिक पोलिसांकडून नाहरकत प्रमाणपत्र घेतले जाते, ज्यामध्ये संबंधित व्यक्तीचे वर्तन, गुन्हेगारी पार्श्वभूमी, देशविरोधी कृती अथवा गैरवर्तन आढळते का, याची माहिती घेतली जाते. विवाहामुळे भारतात आलेल्या महिलांना भारतीय नागरिकत्व कायद्यानुसार कायमस्वरूपी नागरिकत्व प्राप्त होऊ शकते. त्यासाठी संबंधित महिलांनी भारतीय दूतावासात अर्ज करावा लागतो. त्या अर्जाची पाकिस्तान सरकारमार्फत पडताळणी झाल्यावर व त्यानंतर ‘नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट’ मिळाल्यावर भारतीय नागरिकत्व बहाल करण्यात येते.
इतर महत्त्वाच्या बातम्या























