(Source: ECI/ABP News/ABP Majha)
जागर स्त्रीशक्तीचा! आजपासून नवरात्रोत्सवाला प्रारंभ, रंगीत खडूने साकारलं 'आदिशक्तीचं रूप'
चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी आपल्या कलेच्या जोरावर स्त्री शक्तीचा जागर केला आहे.
नाशिक: शारदीय नवरात्रोत्सवाला (Navratri 2023) आजपासून प्रारंभ झाला आहे. राज्यभरात उत्साह असून सर्वत्र आदीशक्तीचा जागर केला जात आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकच्या चांदवड येथील कला शिक्षकाने रंगीत खडूच्या साहाय्याने आदिशक्तीचं रूप साकारला आहे. जणू आजच्या महिलांनी अन्याय सहन करण्यापेक्षा आदिशक्तीच्या रुपात अन्याय करणाऱ्यांना धडा शिकवण्याचा संदेश या फलक रेखाटनातून दिला आहे.
आजपासून शारदीय नवरात्रोत्सवास सुरवात झाली असून पुढील दहा आदिशक्तीचा जागर केला जाणार आहे. या नवरात्रोत्सव काळात आदिशक्ती म्हणून स्त्रीशक्तीचा सर्वत्र जागर केला जातो. महिलांनी विविध क्षेत्रात आपल्या सामर्थ्याने ठसा उमटवला आहे, पण आजही अनेक घटनांच्या माध्यमातून महिलांवरील अत्याचाराच्या घटना काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे तिच्या सुरक्षेसाठी तिनेच पुढाकार घेऊन स्वरक्षणाचा विडा उचलणे आवश्यक असल्याचे सांगितले जाते.
फलक रेखाटनातून स्त्री शक्तीचा जागर
दरम्यान याच पार्श्वभूमीवर चांदवड येथील कला शिक्षक देव हिरे यांनी आपल्या कलेच्या जोरावर स्त्री शक्तीचा जागर केला आहे. महिला सक्षमीकरण, स्त्रीस्वातंत्र्य, महिला सुरक्षा, सबलीकरण हे शब्द फक्त कागदावर, भाषणापुरते व उत्सवापुरते मर्यादित न रहाता प्रत्यक्षात उतरावेत व ' ती ' चा कौतुकमिश्रित गौरव न करता वास्तवात तिचे सामर्थ्य अढळ रहावे यासाठी या नवरात्रोत्सवानिमित्त नाशिकच्या चांदवड येथील नूतन माध्यमिक विद्यालयाचे कला शिक्षक देव हिरे यांनी फलक रेखाटनातून स्त्री शक्तीचा जागर केला आहे..
घट कलशावर रेखाटले तुळजाभवानीचे चित्र...
शारदीय नवरात्रौत्सवाला आजपासून सर्वत्र उत्साहात आनंदात सुरुवात होत आहे..नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने घटस्थापनेसाठी लागणाऱ्या मडक्यावर नाशिकच्या मालेगाव येथील चित्रकार संदीप आव्हाड यांनी तुळजाभवानी मातेचे आकर्षक असे चित्र रेखाटले आहे..सण, उत्सव असले की चित्रकार संदीप आव्हाड हे विविध सण उत्सवाचा विषय हाती घेवून आपल्या कलेने जिवंत देखावे रेखाटत असतात..अतिशय आकर्षक असे तुळजाभवानी मातेचे चित्र आज घटस्थापनेच्या निमित्ताने मडक्यावर त्यांनी रेखाटले आहे.
देवीची मंदिरं सजली, साडेतीन शक्तिपीठाच्या मंदिरांसह घरोघरी घटस्थापना
घरोघरी आणि मंदिरांमध्ये घटस्थापना केली जाते. विजयदशमी पर्यंत म्हणजे 24 ऑक्टोबरपर्यंत हा उत्सव साजरा होणार आहे. या नऊ दिवसात दुर्गा माताच्या नऊ रूपांची पूजा केली जाते.दसऱ्याच्या दिवशी रावण दहन देखील केले जाते. तर या काळात वातावरण भक्तीमय होऊन जातं. नवरात्रोत्सवात भाविक नऊ दिवस उपवास करतात. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपिठामध्ये मोठा उत्साह पाहायला मिळतो. तुळजापुरची तुळजाभवानी, कोल्हापुरची अंबाबाई, माहूरची रेणुकादेवी आणि वणीची सप्तश्रुंगी देवीची मंदिरं सजली आहेत.