Nashik Gangapur Dam : नाशिक शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या गंगापूर (Gangapur Dam) धरणातील साठा वाढू लागला असून पाऊस सुरू झाल्यानंतर तब्बल शंभर दशलक्ष घनफूट इतका साठा वाढल्याने पाणी कपात टळली आहे. तर गंगापूर धरणात जलसाठा 31 टक्क्यांवर आला असून गंगापूर धरण समूहाचा जलसाठा 22 टक्क्यांवर पोहचला आहे. तर सर्वाधिक नांदुरमाध्यमेश्वर (Nandurmadhyameshwer) बंधाऱ्यात 88 टक्के पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. 



गेल्या तीन दिवसांपासून नाशिकसह (Nashik) जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने उघडीप दिली आहे. त्यामुळे काही अंशी जलसाठ्यात पुन्हा घट झाल्याचे चित्र आहे. मात्र नाशिकवरचे पाणीसंकट टळले असून गंगापूर धरणसाठ्यात (Gangapur Dam) हळूहळू वाढ होताना दिसत आहे. नाशिकसह जिल्ह्यातील 24 लहान मोठ्या प्रकल्पात मिळून गेल्या आठवड्यात झालेल्या पावसाने चार टक्के पाणी वाढले आहे. मागील शुक्रवारी जवळपास 21 टक्के इतका साठा होता, त्यानंतर झालेल्या पावसाने अनेक धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली. मात्र पुन्हा तीन दिवसांपासून पावसाने ओढा दिल्याने पाणीसाठ्यात कमी अधिक प्रमाणात घट झाल्याचे चित्र आहे. दरम्यान आतापर्यंतच्या पावसात गंगापूर धरणसाठा 31 टक्क्यांवर गेला आहे. तर गंगापूर धरण समूहात सद्यस्थितीत 22 टक्के जलसाठा असून 2197 दशलक्ष घनफूट इतका साठा आहे. 


नाशिक शहराला गंगापूर आणि दारणा (Darana Dam) तसेच मुकणे धरणातून पाणी पुरवठा केला जात असला तरी यंदा पावसाने ओढ दिली होती. अलीकडे दरवर्षीच जूनच्या अखेरीस पाऊस पडत असला तरी यावर्षी मात्र अलनिनोमुळे मोठा विलंब होण्याची शक्यता होती. प्रभारी आयुक्त पदाचा कार्यभार भाग्यश्री बाणायत यांच्याकडे आल्यानंतर त्यांनी मात्र पाणी कपातीच्या दृष्टीने तयारी सुरू केली होती. त्यानुसार जून 30 पर्यंत पाऊस पडलाच नाही किंवा अत्यल्प पडला, तर शहरात दर पंधरा दिवसांनी एकदा कपात करणार आणि त्यानंतर आठवड्यातून एक दिवस ड्राय डेचे नियोजन होते. मात्र गेल्या काही दिवसांत जोरदार पाऊस झाला. त्र्यंबकेश्वर येथे चांगला पाऊस झाला. त्याचबरोबर गंगापूर पाणलोट क्षेत्रातही चांगला पाऊस झाल्याने सुमारे 100 दलघफु पाणीसाठा वाढल्याने पाणी कपात न करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रभारी आयुक्त भाग्यश्री बानाईत यांनी सांगितले.


नाशिक जिल्ह्यातील पाणीसाठा 


गंगापूर धरण 31 टक्के, कश्यपी 15 गंगापूर धरून समूहात जवळपास 22 टक्के जलसाठा उपलब्ध झाला आहे. तर पालखेड धरण समूहातील पालखेड धरणात 33 टक्के, करंजवण 15 टक्के ओझरखेड 25 टक्के तर दारणा समूहात दारणा धरणात 35 टक्के, मुकणे 46 टक्के, वालदेवी 19 टक्के, नांदूरमध्यमेश्वर तब्बल 88 टक्के भरले आहे. तर गिरणा खोरे धरून समूहातील चणकापूर धरणात 37 टक्के, हरणबारी 38, नागासाक्या धरण अद्यापही कोरडे आहे.