Nashik Teachers Constituency Election 2024 : साने गुरुजी ज्या भागात शिक्षक होते त्याच नाशिक शिक्षक मतदारसंघात आज महिलांना नथ तर पुरुष मतदारांना मतदानासाठी किंमती वस्त्र देण्यात येत असल्याच्या तक्रारी येत असल्याचा दावा शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी (Heramb Kulkarni) यांनी केला आहे.  निवडणूक आयोगाने (Election Commission) तात्काळ याची दखल घेऊन कारवाई करण्याची मागणीही कुलकर्णी यांनी केली आहे. 


नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp) संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली आहे. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघात चौरंगी लढत होणार असून 26 जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नाशिकच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाने शिक्षकांना पैसे वाटपाचा आरोप केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्यातच आता शिक्षणतज्ञ हेरंब कुलकर्णी यांच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण आले आहे. 


मागील निवडणुकीतही पैठणीचे वाटप 


सहा वर्षांपूर्वी झालेल्या नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत शिक्षकांना पैठणी वाटली गेली होती. एका ठिकाणी काही ध्येयवादी शिक्षकांनी ती पैठणी जाळून निषेध सुद्धा  व्यक्त केला होता. त्यावेळी सुद्धा हेरंब कुलकर्णी निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. पण आज सहा वर्षानंतर पुन्हा तेच घडते आहे. काही उमेदवार पुन्हा शिक्षकांना वस्तू वाटप करत असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


महिलांना नथ तर पुरुष मतदारांना कपड्यांचे वाटप


यावेळी पुरुष शिक्षक असेल तर रेमंड कंपनीचे सफारीचे कापड आणि महिला शिक्षक असेल तर नथ दिली जात आहे. त्या भेट वस्तूंचे फोटो सोशल मीडियात फिरत आहेत.जळगाव जिल्ह्यात तर थेट शाळेवर जाऊन असे वाटप करण्याची हिंमत झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने याची दखल घेऊन कारवाई करावी, अशी मागणी हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या 


नाशिकमध्ये महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने, मुख्यमंत्र्यांचा अजितदादांच्या उमेदवाराला फोन, काय झाली चर्चा?


जळगावात शिक्षकांना पैसे वाटल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे म्हणाले, त्यांची कीव येते!