Nashik Teachers Constituency Election 2024 : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी 26 जूनला मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती (Mahayuti) आणि महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aghadi) बैठकांचा धडाका सुरु आहे. तर महायुतीत शिवसेना शिंदे गट (Shiv Sena Shinde Camp) आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा (NCP Ajit Pawar Camp) उमेदवार रिंगणात असल्याने महायुतीत बिघाडी झालेली आहे. त्यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शनिवार नाशिक दौऱ्यावर असताना त्यांनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार अॅड. महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना फोन केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
नाशिक शिक्षक मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाने किशोर दराडे (Kishor Darade) यांना उमेदवारी दिली आहे. तर राष्ट्रवादी अजित पवार गटाने महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena Thackeray Camp) संदीप गुळवे (Sandeep Gulve) यांना उमेदवारी दिली आहे. तर विवेक कोल्हे (Vivek Kolhe) हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या चौरंगी लढतीकडे आता संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
नेमकी काय झाली चर्चा?
नाशिकमध्ये महायुतीचे दोन उमेदवार आमनेसामने आहेत. शनिवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक दौऱ्यावर होते. नाशिक दौऱ्यावर असताना मुख्यमंत्र्यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार महेंद्र भावसार यांच्याशी फोन वरून चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. निवडणुकीतून माघार घेऊन शिवसेनेचे उमेदवार किशोर दराडे यांना मदत करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी महेंद्र भावसारांना केल्याचे समजते. मात्र एकनाथ शिंदे यांच्या मध्यस्थीनंतरही महेंद्र भावसार हे निवडणूक लढवण्यावर ठाम असल्याची माहिती मिळत आहे.
जळगाव शिंदे गटाकडून शिक्षकांना पैसे वाटल्याचा आरोप
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी किशोर दराडे यांच्या प्रचारासाठी नाशिक, जळगाव, अहमदनगरमध्ये सभा घेतल्या. जळगावातील मुख्यमंत्र्यांच्या सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी 'एक्स' सोशल माध्यमावर व्हिडीओ शेअर करत केला. यावरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. तर शिवसेना शिंदे गटाकडून आरोप फेटाळण्यात आला आहे.
आणखी वाचा
'शिक्षकांना शेअर बाजाराप्रमाणे भाव लावला जातोय', संजय राऊतांचा मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल