नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या जळगावातील सभेनंतर महायुतीच्या नेत्यांकडून शिक्षक, कर्मचारी, मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना पैसे वाटप करण्यात आल्याचा गंभीर आरोप ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी  व्हिडीओ शेअर करत केला. यावरून राजकीय वातावरण तापले असून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  


शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जातोय


संजय राऊत म्हणाले की, मुख्यमंत्री नाशिकला येऊन गेले.  ते कशासाठी येतात हे सर्वांनाच माहिती आहे. शेअर बाजाराप्रमाणे शिक्षकांना भाव लावला जात आहे.  शिक्षकांना विकत घेऊ नका, परंपरा मोडू नका. जळगावला पैसे वाटप झाल्याचा आरोप सुषमा अंधारे यांनी व्हिडीओद्वारे केला. लोकसभा निवडणुकीत हेलिकॉप्टरमधून 20 कोटी उतरवले हे सगळ्यांनी पाहिले. पदवीधर, शिक्षक वर्गाला या बाजारात ओढू नका. निवडणूक आयोग उघड्या डोळ्यांनी व्यभिचार पाहत आहे.  लोकशाहीची हत्या होत आहे.  या निवडणूक आयोग धृतराष्ट्राप्रमाणे वागत आहे. 


लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली जातात


ते पुढे म्हणाले की, दिंडोरीत भास्कर भगरे यांच्या विरोधात नाम साधर्म्य असणारा भगरे नावाचा उमेदवार समोरच्यांनी उभा केला होता. भास्कर भगरे यांच्या नावाप्रमाणे भास्कर भगरेला गुरुजी लावले नाही. तिसरी पास उमेदवाराच्या नावापुढे सर लावण्यात आले.  त्याला पिपाणी चिन्ह दिले. लोकांची फसवणूक करून मत घेण्याचा प्रकार झाला. डमी उमेदवाराची पद्धत बंद व्हायला पाहिजे.  लोकांना भ्रमित केलं जात आणि मत घेतली जातात.  यातून मार्ग काढावा लागेल.  संदीप गुळवे यांना मत द्यायचे तर डुप्लिकेटला दिलं जातं. लोकांना उद्धव ठाकरे यांना मत द्यायचे होते मात्र धनुष्यबाणला मत दिली गेली. 


निवडणूक आयोगात तक्रार करणार : सुषमा अंधारे 


याबाबत एबीपी माझाशी संवाद साधताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, जळगावात दराडे यांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा झाली. ही सभा झाल्यानंतर सभेला उपस्थित असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना पैसे वाटत असतानाचा व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे. सकाळपासून शिंदे गटाचे नेते सांगत आहेत की, असे काही घडले नाही. सभेला उपस्थित असणाऱ्या अपक्ष उमेदवारांनी हे व्हिडिओ काढले आहेत. याबाबत आणखी व्हिडिओ आहेत आणि मी याची रीतसर निवडणूक आयोगात तक्रार करणार आहे, असे त्यांनी म्हटले आहे. 


आणखी वाचा 


जळगावात शिक्षकांना पैसे वाटल्याचा सुषमा अंधारेंचा आरोप, शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे म्हणाले, त्यांची कीव येते!