Nashik Satpir Dargah: नाशिकमधील अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी पोलिसांवर दगडफेक, एमआयएमच्या बड्या नेत्याला अटक
Nashik Satpir Dargah: नाशिक महापालिकेने 1 एप्रिलला दर्गा अनधिकृत ठरवत 15 दिवसांच्या आता अतिक्रमण काढून घ्या, अशी नोटीस दिली होती. पाडकामावेळी जमावाची तुफान दगडफेक

Nashik News: नाशिकच्या काठे गल्ली परिसरातील अनधिकृत दर्ग्याच्या पाडकामावेळी पोलिसांवर तुफान दगडफेक करण्यात आली होती. या दगडफेकीत तब्बल 31 पोलीस कर्मचारी जखमी झाले होते. या प्रकाराची गंभीर दखल घेत पोलिसांनी जमावातील लोकांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली होती. आतापर्यंत नाशिकच्या मुंबई नाका पोलीस ठाण्यात 1400 ते 1500 अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामध्ये काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
नाशिक पोलिसांनी दगडफेक प्रकरणात एमआयएम पक्षाचे (MIM Party) शहराध्यक्ष मुख्तार शेख याला अटक केली आहे. तसेच पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये काँग्रेस, ठाकरे गट, शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांचाही समावेश असल्याचे सांगितले जात आहे. MIM शहराध्यक्ष मुख्तार शेख याला रात्री उशिरा पोलिसांनी अटक केल्याची माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांनी दिली. त्यामुळे आता यावरुन नाशिकच्या राजकीय वर्तुळात काय पडसाद उमटतात, हे बघावे लागेल.
बुधवारी पहाटे काठे गल्लीतील अनधिकृत सातपीर दर्गा जमीनदोस्त करण्यात आला होता. त्यापूर्वी मंगळवारी रात्री काही धार्मिक विधी पार पाडण्यासाठी दर्ग्याचे ट्रस्टी, प्रतिष्ठित नागरिक आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते. त्यावेळी बाजूच्या चौकातून जमाव पोलिसांच्या दिशेने धावून आला होता. या जमावाने दर्ग्याच्या पाडकामाला विरोध करत तुफान दगडफेक केली होती. अखेर पोलिसांनी अश्रुधुराची नळकांडी फोडत आणि सौम्य लाठीमार करुन जमावाला पांगवले होते. यावेळी पोलिसांना आजुबाजूच्या परिसरातून 57 बाईक्स मिळाल्या होत्या. या दुचाकी दगडफेक करणाऱ्यांच्या असल्याचा संशय पोलिसांना होता. त्याआधारे पोलिसांनी तपासाला सुरुवात केली होती. पोलिसांनी आतापर्यंत एकूण 25 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
नाशिक पोलिसांनी दर्ग्याच्या ट्रस्टींचा दावा फेटाळला
सातपीर दर्ग्याचे पाडकाम करुन ही जागा पूर्णपणे सपाट केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांमुळे याप्रकरणात नवा ट्विस्ट आला होता. दर्गा ट्रस्टने याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने पुढील कारवाईला स्थगिती दिली होती. या पार्श्वभूमीवर दर्ग्याचे ट्रस्टी फईम शेख यांनी पोलिसांची कारवाई अनधिकृत असल्याचा दावा केला. दोन धर्मात वाद लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. दगडफेक झाली, त्याचे आम्ही समर्थन करत नाही. ही निंदनीय बाब आहे. नाशिक पोलिसांवर दगडफेक करणारे स्थानिक नागरिक नव्हते, असा दावा फईम शेख यांनी केला. मात्र, पोलिसांनी हा दावा फेटाळून लावला.
आणखी वाचा
नाशिक महानगरपालिकेने दर्गा जमीनदोस्त केल्यानंतर सुप्रीम कोर्टाची कारवाईला स्थगिती, आता काय घडणार?























