Nashik News : आपण मोठ्या उत्साहात भारताच्या स्वातंत्र्याची पंच्याहत्तरी साजरी करत आहोत. मात्र अद्यापही देशातील वाड्या वस्त्यांवरची बकाल अवस्था जैसे थे आहे. आरोग्याचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला असून अद्यापही सक्षमपणे आरोग्य व्यवस्था उभी नसल्याने जगण्याची आस लावून बसलेला माणूसही मरणाला कवेत घेत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. अशा स्थितीत गरोदर मातांच्या (Pregnant Women) बाबतीतही प्रशासन उदासीन असल्याचे चित्र नाशिकच्या (Nashik) एका घटनेवरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 


काही महिन्यांपूर्वीच नाशिक जिल्हा रुग्णालय (Civil Hospital) आणि सटाणा ग्रामीण रुग्णालयाच्या (Satana Hospital) दारातच महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली होती. आणखी एक विदारक प्रसंग निफाड (Niphad) तालुक्यात समोर आला आहे. निफाड तालुक्यासह महत्वपूर्ण गाव असलेल्या चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रवेशद्वारावर महिलेची प्रसूती झाल्याची घटना घडली आहे. निफाडच्या चितेगाव येथील उस्मान मोतीराम सय्यद यांची पत्नी शबाना उस्मान सैय्यद पोट दुखत असल्याने प्रसूतीसाठी (Child Birth) चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या. दाखल झाल्या झाल्या त्यांना पुढील आरोग्य सेवेची आवश्यकता असताना पंधरा मिनिटांपर्यत कुणीही आले नाही, शेवटी प्रसूतीकळा वाढत असल्याने महिलेची प्रसूती रुग्णालयाच्या दारातच झाली. 


अवघ्या देशभरात काल मातृदिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. अनेकांच्या स्टेटसवर, डीपीवर, सोशल मीडियावर आपापल्या आईचा फोटो ठेऊन कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. मात्र याच दिवशी आयुष्यातील सर्वात मोठं सुख असलेल्या, आई होण्याच्या प्रक्रिये दरम्यानच व्यवस्थेच्या दयनीय कळा एका मातेला सोसाव्या लागल्या आहेत. निफाड तालुक्यातील ही घटना असून चितेगाव येथील सय्यद कुटुंबातील महिला शबाना सय्यद या गरोदर होत्या. काल पहाटेपासूनच त्यांना पोट दुखत असल्याचे जाणवू लागले होते. त्यामुळे कुटुंबीयांनी क्षणाचाही विलंब न करता रुग्णालयात जाण्याचे ठरविले. त्यानुसार चितेगावहून ते चांदोरी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रविवारी सकाळी 9 वाजून 40  मिनीटांनी दाखल झाले. मात्र रविवार असल्याने अनेक कर्मचाऱ्यांची वाणवा दिसून आले. 


दरम्यान शबाना यांना प्रसूती कळा सुरूच होत्या. कोणत्याही क्षणी प्रसूती होणार हे दिसत होते. मात्र कुटुंबीयांनी आवाज देऊनही कुणाचाच पत्ता नव्हता. तब्बल 15 मिनिटे वाट बघून कर्मचारी खाली न आल्याने प्रसूती कळा सुरू झाल्याने मोठ्या आवाजात ओरडत असल्याचे बघून उपस्थित गोकुळ टर्ले, राजेंद्र टर्ले, निलेश नाठे हे धावत वरच्या मजल्यावर येत उपस्थित डॉ आशिष गायकवाड व नर्स यांना खाली बोलावले. तोवर सदर महिलेची सुखरूप प्रसूती होऊन मुलगा जन्माला आला होता. शबाना यांनी मातृदिनाच्या दिवशी एका गोंडस बाळाला जन्म दिला होता. मात्र आरोग्य व्यवस्थेच्या भोंगळ कारभाराचा सामना त्यांनी करावा लागल्याची खंत उपस्थितांनी बोलून दाखवली. 


बहुतांश कर्मचारी सुट्टीवर 


एकीकडे संबंधित चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रात 29 मंजूर पदे असताना फक्त 17 पदे भरलेली आहे. त्यात रविवार असल्याने बहुतांश कर्मचारी सुट्टीवर होते. तर दुसरीकडे मागील आठवड्यात 14 शस्रक्रिया आणि 1  प्रसूतीसाठी महिला दाखल असतांना तब्बल 6 दिवस पिण्याचे पाणी उपलब्ध नव्हते. रुग्णाच्या नातेवाईकांना घरून पाणी आणावे लागत होते. ही परिस्थिती केवळ चांदोरी प्राथमिक आरोग्य केंद्रापुरती मर्यादित नाही तर जिल्ह्यातील अनेक प्राथमिक आरोग्य केंद्राची हीच अवस्था आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक लोकप्रतिनिधींनी आवाज उठवला आहे. आरोग्य केंद्रात पुरेसे कर्मचारी नसल्याने अशा घटना वारंवार घडत असतात. तसेच शासनाने लवकरात लवकर पदभरती करावे. सद्यस्थितीत या प्राथमिक आरोग्य केंद्रात 15 गावे असून 6 उपकेंद्रे आहे. गेली कित्येक वर्षांपासून कर्मचारी कमतरता असून अनेकदा पाठपुरावा करून ही रिक्त कर्मचाऱ्यांची पूर्तता करण्यात आलेली नाही, अशी मागणी करण्यात आली आहे.