Nashik News:  नाशिकसह जिल्ह्यात (Nashik) उन्हाची तीव्रता वाढत (Heat Wave) असल्याने उष्माचा त्रास जाणवतो आहे. उन्हाच्या दाहकतेमुळे नाशिकच्या रविवार कारंजावरील चांदीच्या गणेश मूर्तीला (Ganesh Mandir) चंदनाची उटी लावण्यात आली तर गाभाऱ्यात मोगऱ्याच्या माळा लावण्यात आल्या आहेत. जवळपास 21 किलो चंदन आणि 51 किलो मोगराची फुलं वापरण्यात आली आहे. चंदन आणि मोगऱ्यामुळे गाभाऱ्यात सुगंध दरवळत असून गाभाऱ्यात शीतलता निर्माण झाली आहे.


राज्यासह नाशिकचा पारा चाळीशीजवळ असल्याने दिवसभर सूर्य आग ओकत आहे. त्यामुळे दिवसा घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. अंगाची लाही लाही होत असताना शहरातील चांदीच्या गणपतीला उन्हाच्या दाहकतेपासून वाचविण्यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला आहे. उन्हाच्या या तडाख्यापासून बचावासाठी मंदिरातील मूर्तींना संरक्षण मिळावे यासाठी चंदनाचा लेप लावण्यात आला असून वैशाख वणवा सुरू झाल्यानंतर हा चंदनाचा लेप लावण्याची अनोखी परंपरा आहे.


नाशिक शहरातील रविवार कारंजा येथे असलेल्या सुप्रसिद्ध चांदीच्या गणपतीला तब्बल 21 किलो चंदन उटीचा लेप लावण्यात आला आहे. वाढत्या उष्णतेपासून गणरायाच्या मूर्तीचे संरक्षण व्हावे, या उद्देशाने हा लेप लावण्यात आला आहे. आज पहाटे चांदीच्या गणपती मंदिरात चंदन उटी मोगरा महोत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवात 21 किलो चंदनाची उटी आणि 50 किलो मोगऱ्याचा समावेश आहे. विधीवत पुजा करुन आज हा लेप लावण्यात आला आहे. उन्हाळ्यातही थंड वाटणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकचे तापमान दिवसेंदिवस प्रचंड वाढत आहे. उन्हाची दाहकता शहरात अनुभवयास येत आहे. 


असा पार पडला मोगरा महोत्सव...
चांदीच्या गणपती मूर्तीची दाहकता कमी व्हावी, यासाठी पारंपारिक पद्धतीने मृदू, पवित्र चंदन उटी केली जाते. या पार्श्वभूमीवर गाभाऱ्यात रंगीबेरंगी व सुगंधी फुलांची सजावट करण्यात आली होती.
पहाटे साडेपाचच्या सुमारास अभिषेक घातल्यानंतर, श्रीं च्या मूर्तीला मंत्रोच्चाराच्या घोषात विधीवत चंदन उटीचा लेप लावण्यात आला. दुपारी बारा वाजता महापूजा झाल्यानंतर चांदीच्या गणपतीला महानैवेद्य करण्यात आला.


उष्णतेची लाट कायम


दरम्यान यंदा उन्हाची दाहकता प्रचंड असून आतापर्यंत राज्यात उष्माघाताने चार जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक जिल्ह्यातील दोन घटनांचा समावेश आहे. मे महिना हा तीव्र उन्हाचा समजला जातो. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा जाणवू लागल्या आहेत. त्यातच नाशिकच तापमान हे चाळीशीजवळ आहे. त्यामुळे काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.