Nashik Crime : नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील सायखेडा परिसरात (Saykehda Police) शिर नसलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. संबंधित युवकाचा खून करणाऱ्या संशयितांचा छडा लावण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना (Nashik police) यश आले आहे. मोबाईल घेण्याच्या वादातून दोघा मित्रांनी तिसऱ्याला संपवल्याची थरारक घटना पोलिसांनी उघडकीस आणली आहे. 


नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यांत गुन्हेगारी कमी होण्याचे नाव नसून रोज प्राणघातक हल्ले, खून (Murder) आहे घटना घडत आहेत. शहरात ज्या प्रकारे गुन्हेगारी वाढली आहे, त्याच प्रकारे जिल्ह्यातील ग्रामीण भागातही गुन्हेगारी वाढत चालली आहे. अशातच काही दिवसांपूर्वी सायखेडा पोलीस स्टेशनच्या हद्दीत गोदावरी नदी पात्रात एका शीर नसलेल्या युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पुरावा नष्ट करण्याचे उद्देशाने शीर कुठेतरी विल्हेवाट करून धड हे गोणपटात टाकून गोदावरी नदीपात्रात टाकून देण्यात आले होते. यावरून सायखेडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.


दरम्यान, शीर आणि धड दोन्ही वेगवगेळ्या ठिकाणी असल्याने ओळख पटविणे पोलिसांसमोर अवघड होते. सदर गुन्ह्यातील मयताच्या हातावर गोंदलेले माँ आणि हितेश नाव तसेच अंगावरील कपडे, हातातील पिवळ्या रंगाचे रबर बॅन्ड यावरुन त्याची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. पिवळ्या रंगाच्या रबरी बॅन्डबाबत स्थानिक बाजारात चौकशी करण्यात आली. तसेच शवविच्छेदन अहवाला संबंधित युवकाचा खून चार ते पाच दिवस अगोदर झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पोलिसांना मिळालेल्या माहितीच्या आधारे खेरवाडी परिसरातून संशयित शरद वसंत शिंदे, आलीम लतीफ शेख यांना ताब्यात घेण्यात आले.


सदर गुन्ह्यातील दोघा संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर विचारपूस केली. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ते दोघे खेरवाडी येथील शेतकरी जगदीश संगमनेरे आणि संदीप संगमनेरे यांचे शेतात सालदार म्हणून शेती काम करत होते. यातील जगदीश संगमनेरे यांनी मागील महीन्यात पेठ फाटा, नाशिक शहर परिसरातून हितेश नावाचे मजूरास शेती कामकाजासाठी खेरवाडी येथे आणले होते. दरम्यान 7 फेब्रुवारी रोजी हितेश आणि शरद यांच्यात मोबाईल घेण्यावरून वाद झाले. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर हितेशच्या डोक्यात लोखंडी गजाने प्रहार केला. त्यात तो रक्तबंबाळ होवून खाली कोसळून मृत्यू झाला. 


याच दरम्यान त्यांचे मालक जगदीश संगमनेरे, संदीप संगमनेरे आणि जगदीश यांचा मुलगा योगेश संगमनेरे असे त्याठिकाणी आले. त्यावेळी सदर ठिकाणी घडलेला प्रकार पाहून गावात बदनामी होईल. तसेच बटाईने करत असलेली शेती जाईल आणि शेती कामास पुन्हा मंजूर मिळणार नाही. यादृष्टीने त्यांनी गुन्ह्यातील इतर संशयितांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितल्याचे पोलीस तपासात समोर आले. या प्रकरणी शरद वसंत शिंदे, आलीम लतीफ शेख, जगदीश भास्कर संगमनेरे, योगेश जगदीश संगमनेरे यांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सायखेडा पोलीस स्टेशनचे सपोनी पप्पू कादरी यांचे पथक करत आहे.