Nashik News: मरणानंतरही ' नशिबी ' यातनाच; स्मशानभूमी अभावी मृतदेहाची होते हेळसांड, ताडपत्रीखाली करावे लागले अंत्यसंस्कार
Nashik News: सुरगाणा तालुक्यातील पळशेत येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे.
सुरगाणा : इतकेच मला जाताना सरणावर कळले होते मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...या कवी सुरेश भटांच्या कवितेतून माणसाचे जिवन खरं तर खूपच खडतर आहे. मृत्यूनंतरच त्यातून सुटका होते याचा प्रत्यय येतो. मात्र माणसाच्या मृत्युनंतरही सुटका नशिबी नाही असे म्हणण्याची वेळ सध्या सुरगाणा तालुक्यातील पळशेत येथील ग्रामस्थांवर आली आहे एकीकडे शहरात मशीनच्या वापराने एका बटनावर प्रेताची व्हिलेवाट लावली जाते, मात्र गावखेड्यात अजूनही स्मशानभूमीच नसल्याने किती मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे विदारक चित्र या घटनेवरून लक्षात येते..
सुरगाणा तालुक्यातील पळशेत येथे स्मशानभूमी अभावी भरपावसात अंत्यसंस्कारासाठी प्लास्टिकच्या ताडपत्रीचा आधार घ्यावा लागत आहे. मृतदेहावर ताडपत्री धरून कसे बसे सरण रचत संततधार पावसातच चितेला अग्नी देण्याची वेळ मृतांच्या कुटुंबिय आणि ग्रामस्थांवर आली आहेमाळेगाव ग्रामपंचायतीत माळेगांव, भरडमाळ, केळुणे, सालभोये, पिळूकपाडा, पाथर्डी,पारचापाडा या एकाही गावात स्मशानभूमी शेड नसल्याने मरणानंतर मृतदेहाला येथे नरक यातना सोसाव्या लागत आहे. सुरगाण्यातील 90 टक्के गावे, वाड्या - पाड्यावर स्मशानभूमी शेड नसल्याने पावसाळ्यात अंत्यसंस्कार करण्यात अनंत अडचणी येत असतात. प्रशासनाने तातडीने येथे स्मशानभूमी शेड उभारून मृतदेहाची अवहेलना थांबवावी अशी मागणी होत आहे..
मरणानंतर मरण यातना भोगाव्या लागत आहे
सध्या पावसाचे दिवस असल्याने मृतदेहाची मोठी हेळसांड होत आहे. येथे स्मशानभूमी नसल्याने येथील ग्रामस्थांना अंत्यविधीसाठी वणवण भटकावे लागत आहे. यावेळी अंत्यविधी करण्यासाठी ग्रामस्थांना सरण रचतांना चितेवर चक्क ताडपत्रीचा आधार घ्यावा लागला. कसे बसे सरण रचल्यानंतर संततधार पावसामुळे चितेला अग्नी द्यायचा कसा असा प्रश्न नागरिकांना पडला. यावेळी पाऊस कमी झाल्यावर तातडीने ग्रामस्थांनी चितेला अग्नी देतात. एकूणच मरणानंतर मरण यातना भोगाव्या लागत असल्याचे हे उदाहरण म्हणावे लागेल.
आजही आदिवासी अतिदुर्गम भागातील खेडोपाडी अजून ही स्मशानभूमीसाठी प्रतिक्षा करावी लागतेय हे न उलगडणारे कोडे आहे. आदिवासी भागात दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र अनेक गावात स्मशानभूमीपर्यंत रस्ता नसल्याने चिखलातून वाट काढावी लागते, तर काही ठिकाणी नदीतून कमरे एवढ्या पाण्यातून मृतदेह वाहून घ्यावे लागतात. शेड नसल्याने उघड्यावर अंतिम संस्कार करण्यात येतात.
हे ही वाचा:
Nandurbar News : खाकी वर्दीतील माणुसकी, नंदुरबार पोलिसांनी स्मशानभूमीत जे केलं ते पाहून तुम्हालाही हेवा वाटेल!