Nashik News : हृदयद्रावक... डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी अंत, नाशिकच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Nashik News : डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिक : जिल्ह्यातून एक हृदय पिळवून टाकणारी बातमी समोर आली आहे. नामपूर (Nampur) येथील हिरा हॉस्पिटलचे संचालक तथा भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सी. एन. पाटील (Dr C N Patil), जिप सदस्या सुनीता पाटील (Sunita Patil) यांच्या डॉक्टर मुलाचा आणि डॉक्टर जावयाचा एकाचा दिवशी मृत्यू झाला आहे. या दोघांवर एकाच दिवशी अंत्यसंस्कार करण्याची वेळ दाम्पत्यावर आली आहे. या हृदयद्रावक घटनेने नाशिकवर शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कोरोना (Corona) काळात डॉ. सी. एन. पाटील यांनी नागरिकांची अहोरात्र सेवा केली. गोरगरीब रुग्णांच्या हक्काचा दवाखाना म्हणून डॉ. पाटील यांची नाशिकमध्ये ओळख आहे. परंतु डॉक्टर मुलाचा काविळने तर जावयाचा डेंग्यूने एकाच दिवशी मृत्यू झाल्याने पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
डॉक्टर मुलाचा काविळमुळे अंत
डॉ. सी. एन. पाटील यांचा मुलगा डॉ. आदित्य चिंतामण पाटील (Dr Aaditya Patil) याने लातूर वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएस पदवी घेतली होती. तो वडिलांच्या व्यवसायात मदत करत होता. सुमारे 20 दिवसांपूर्वी त्याला काविळची लागण झाली होती. आदित्यला उपचारासाठी आधी मालेगावला त्यानंतर नाशिकला नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी अंत झाला. मोसम तीरावरील स्मशानभूमीत त्याच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
डॉक्टर जावयाचे डेंग्यूने निधन
तर दुसऱ्या घटनेत डॉ. सी. एन. पाटील यांचे जावई निवृत्त वन अधिकारी वामनराव खैरनार यांचे चिरंजीव डॉ. विजय वामनराव खैरनार (Dr Vijay Khairnar) यांना काही दिवसांपूर्वी डेंग्यूची लागण झाली होती. त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांनी प्राणज्योत मालवली. कुपखेडा येथील मूळ रहिवासी असलेल्या पाटील आणि खैरनार कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
पोलिसांच्या वाहनाचा भीषण अपघात
दरम्यान, पालमकमंत्री दादा भुसे (Dada Bhuse) यांच्या मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज कृषी विज्ञान संकुलाचे लोकार्पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते होणार होते. या दौऱ्याच्या बंदोबस्तासाठी निघालेल्या पोलिसांच्या (Police) गाडीचा चांदवड येथील राहुड घाटात भीषण अपघात झाला. या अपघातात 12 पोलीस कर्मचारी जखमी झाले. वाहन चालक चालक पुरुषोत्तम मोरे यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाली आहे. तसेच निलेश लोंढे, जयवंत चौधरी, कुमार जाधव, किरण आहेर, चेतन तुंगर, निलेश खंडाळे, शीतल गायकवाड, किशोर बोडके, नानाजी मारवांडे, शांताराम गाढे, निलेश आहीरे हे पोलीस कर्मचारी किरकोळ जखमी झाले आहेत.
आणखी वाचा