Nashik : मुंबई महापालिकेनंतर आता नाशिक महापालिकेची प्रभाग रचना जाहीर
Nashik Election News : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. नाशिक महापालिका निवडणुकीसाठी प्रशासनाने प्रभाग रचना जाहीर केली आहे.
Nashik Election News : राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर नाशिक महापालिकेची प्रभाग रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नाशिकरांसह राजकीय नेते आणि इच्छुकांचे लक्ष आगामी निवडणुकाकडे लागले आहे. दरम्यान ही प्रभाग रचना प्रसिद्ध झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने निवडणुकांचे वारे वाहू लागणार आहेत.
दरम्यान कोरोनामुळे मागील दोन वर्षापासून रखडलेल्या राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपालिकाच्या निवडणुका रखडल्या होत्या. नाशिक महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणे अपेक्षित होते. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर निवडणूक प्रक्रिया १५ दिवसात थांबलेल्या टप्प्यावरून पुढे सुरु करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.
त्यानुसार आता निवडणूक आयोगाने राज्यातील १४ महापालिकाना निवडणूक प्रक्रिया तातडीने सुरु करण्याचे निर्देश देत कार्यक्रम आखून दिला होता. या कार्यक्रमानुसार १७ मेपर्यत अंतिम प्रभाग रचना जाहीर करण्याच्या आदेशाचे पालन करताना नाशिक महापालिका प्रशासनाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
राज्य सरकारने आखून दिलेल्या प्रस्तावानुसार आता नाशिकमध्ये १३३ नगरसेवक असून एकूण ४४ प्रभाग असणार आहेत. नाशिक महापालिकेच्या मुख्य कार्यालयासह प्रभाग समितीच्या सर्व कार्यालयात प्रभाग रचना आणि सीमारचनाची माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. नाशिक मनपा कार्यालयात झालेल्या बैठकीत ही प्रभाग रचना जाहीर करण्यात आली. त्यांनतर महापालिकेच्या सहाही विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी प्रभाग रचनेचा प्रारूप आराखडा उपलब्ध करून देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूक घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले होते. त्यानुसार प्रभाग रचना अंतिमतः जाहीर करण्याचा कार्यक्रम घोषित करण्यात आला. मुंबई पाठोपाठ नाशिक महापालिका निवाफणुकीची प्रभाग रचना प्रसिद्ध झाली असून आता लवकरच निवडणुकाही पार पडतील अशी आशा ठेवून पुन्हा एकदा इच्छुकांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे.