(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime News : नाशकात एमडी ड्रग्ज डिलरसह पेडलर्सला अटक; तीन लाखांचा मुद्देमाल हस्तगत
Nashik News : अंबड परिसरात एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या डिलरसह शहरातील पेडसर्लला चुंचाळे पोलीस चौकीच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून तीन लाखांचे एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे.
Nashik Crime News नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक शहरात (Nashik City) पुन्हा एमडी ड्रग्ज (MD Drugs) सापडल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी सुरुवातीला दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सराईत गुन्हेगारांना एमडी ड्रग्ज (MD Drugs Case) पुरवणारा अनंत जायभावेच्या (Anant Jaybhave) पोलिसांनी मुसक्या आवळल्या होत्या. आता एमडी ड्रग्जचे डिलर अन् पेडलर्स पोलिसांच्या हाती लागले आहेत.
अंबड परिसरात एमडी विक्री करण्यासाठी आलेल्या मुंबईच्या डिलरसह शहरातील पेडसर्लला चुंचाळे पोलीस चौकीच्या पथकाने अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचे 27.5 ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत.
पाच जणांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या
मुश्ताक शौकत अली शेख उर्फ भुऱ्या (30, रा.अभियंतानगर, पदमा हॉटेलच्या पाठीमागे, कामटवाडे, सिडको, नाशिक) असे एमडी ड्रग्ज खरेदी करणाऱ्या रिक्षाचालकाचे नाव आहे. ठाण्यातील मुंब्रा येथून ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या मोहम्मद शोएब शकील शेख (20, रा. गोवंडी ईस्ट डंपिंग रोड, डॉ. झाकिर हुसैननगर, मुंबई. मुळ रा. गुडसायगंज, जि. कन्नोज, उत्तर प्रदेश), रिजवान खुर्शिद खान (33, रा. गोवंडी रिंग रोड, डॉ. झाकीर हुसैननगर, गोवंडी पूर्व), शफीगफूर रहमान मन्सुरी (31, रा. गोवंडी रिंग रोड, गोवंडी पूर्व), मेराज सज्जाद कुरेशी (28, रा. गोवंडी रिंग रोड, गोवंडी पूर्व) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे रचला सापळा
मुंब्रा येथून काही संशयित अंबडजवळील एक्सलो पॉईंटजवळ अंमली पदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची गोपनीय माहिती अंबड पोलीस ठाण्याच्या चुंचाळे एमआयडीसी पोलीस चौकीचे अंमलदार अनिल कुऱ्हाडे यांना मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त मोनिका राऊत, सहायक आयुक्त शेखर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चुंचाळे पोलीस चौकीचे पोलिस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या नेतृत्वाखाली सापळा रचण्यात आला.
तीन लाखांचा मुद्देमाल जप्त
संशयित रिक्षाचालक भुऱ्या हा मुंबईवरून आलेल्या संशयितांना पैसे देऊन त्यांच्याकडून पाकिटातून एमडी ड्रग्ज खरेदी करताना आढळून आला. यावेळी चुंचाळे पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेतले. संशयितांकडून 27. 5 ग्रॅम एमडी ड्रग्ज, चार मोबाईल, ३४ हजार रुपये, दुचाकी, रिक्षा, असा ३ लाख ३४ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यांनी केली कारवाई
प्रभारी पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे, सहायक निरीक्षक गणेश मुगले, उपनिरीक्षक संदीप पवार, समाधान चव्हाण, जाधव, कांदळकर, नेहे, कुर्हाडे, जनार्दन ढाकणे, विराजदार खैरनार, सोनवणे, महिला पोलीस खर्डे, भालेराव यांच्या पथकाने ही कारवाई केली.
आणखी वाचा