नाशिक : यंदाचा पावसाळा (Rainy Season) संपला असून दरवर्षीपेक्षा या वर्षी पावसाळ्याच्या हंगामाने नाशिककरांची (Nashik) घोर निराशा केली. यंदा पावसाळ्याच्या हंगाम संपूनही पाऊस वार्षिक सरासरी गाठू शकला नाही. त्यामुळे पावसाची तब्बल 31 टक्के तूट असून, जिल्ह्यात फक्त 68.92 टक्के पावसाची (Nashik District Rain) नोंद झाली आहे. त्यामुळे येत्या काळात शेतकऱ्यांना चांगला फटका बसण्याची शक्यता आहे. तसेच पाणीटंचाईचे सावट पसरण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. 


या हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने (Rain) नाशिक जिल्ह्यासह राज्यावर (Nashik Rain Update) अवकृपा केल्याचे पाहायला मिळाले. यंदाच्या हंगामात थेट जूनच्या शेवटी पावसाने हजेरी लावत मान्सूनला सुरवात केली. त्यानंतर मात्र पावसाने उघडीप दिली, ती कायमचीच. दरवर्षीं पडणाऱ्या पावसापेक्षा यंदाच्या पावसाचे चित्र काहीसे वेगळेच पाहायला मिळाले. अनेकदा वातावरण होऊनही पाऊसाने हुलकावणी दिली. जुलै महिन्यातील काही दिवस सोडले तर पावसाने विश्रांतीच घेतल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर सगळीकडे दुष्काळाची (Nashik Drought) स्थिती निर्माण झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. मात्र सप्टेंबरच्या सुरवातीला पावसाने चांगली हजेरी लावली. नाशिकसह जिल्ह्यात सप्टेंबरच्या पावसाने शेतकऱ्यांना दिलासा दिला. मात्र आता पावसाचा हंगाम संपला असून एकूणच आकडेवारी पाहिली असता सरासरीपेक्षा खूपच कमी पाऊस झाल्याची नोंद करण्यात आली आहे. 


साधारण 1 जून ते 30 सप्टेंबर हा पावसाचा हंगाम असतो. शनिवारी तो संपला. पावसाळ्याच्या हंगामात नाशिक जिल्ह्यातील 15 तालुक्यांमध्ये सरासरी 933.8 मिलीमीटर पाऊस पडणे अपेक्षित होते. परंतु यंदा सुरुवातीपासूनच पावसाचा जोर कमी राहिला. जूनच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पावसाला सुरुवात होऊ शकली नाही. जूनमध्ये पावसाने वर्दी दिली परंतु, तो सरासरीइतका पडू शकला नाही. त्यानंतर जुलै आणि ऑगस्टमध्येदेखील पावसाने नाशिककरांची निराशाच केली. सप्टेंबरमधील काही दिवसांत पावसाचा जोर वाढला. यामुळे सप्टेंबर महिन्यातील पावसाची सरासरी ओलांडली. परंतु दुर्दैवाने पाऊस वार्षिक सरासरी मात्र गाठू शकलेला नाही. वार्षिक सरासरीच्या केवळ 68.9 टक्के म्हणजेच 644.4 मिमी पाऊस पाऊस झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. याचा फटका येणाऱ्या रब्बी हंगामासह पुढील वर्षभर जाणवण्याची भीती व्यक्त होते आहे. विशेषतः शेतकऱ्यांचा याची अधिक झळ सोसावी लागणार आहे. 


असा आहे जिल्ह्यातील पाऊस?


नाशिक जिल्ह्यातील 15 तालुके असून त्यापैकी बहुतांश तालुक्यांमध्ये 70 ते 75 टक्के पाऊस झाला आहे. इगतपुरी तालुक्यात सरासरीच्या केवळ 55 टक्के पाऊस झाला आहे. नांदगाव तालुक्यातही 64 टक्केच पाऊस झाला आहे. दिंडोरी तालुक्यात 119.5 टक्के पाऊस झाला असून अन्य सर्व 12 तालुक्यात सरासरी 70 ते 76 टक्के पावसाची नोंद झाली आहे. यंदा सरासरीच्या 69 टक्के पाऊस झाला असून, इगतपुरी तालुक्यात सर्वात कमी ५५ टक्केच पाऊस आहे. मालेगाव तालुका साधारण पडणारा पाऊस 457 मिलिमीटर तर यंदा पडलेला पाऊस 331 मिलिमीटर, नांदगाव तालुक्यात 491 मिलिमीटर तर प्रत्यक्ष पडलेला पाऊस 315 मिलिमीटर, नाशिक तालुक्यात पाऊस 695 मिलिमीटर तर प्रत्यक्ष पडलेला पाऊस 527 मिलिमीटर, सिन्नर तालुक्यात साधारण पडणारा पाऊस 522 मिलिमीटर तर यंदा पडलेला पाऊस 366 मिलिमीटर, त्र्यंबकेश्वर तालुक्यात साधारणपणे पाऊस 2166 मिलिमीटर तर प्रत्यक्ष पडलेला पाऊस 1614 मिलिमीटर अशी नोंद करण्यात आली आहे.