नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातील बाजार समित्यामध्ये गेल्या 13 दिवसांपासून कांदा लिलाव बंद (Onion Auction) असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. दुसरीकडे लासलगाव बाजार समिती (Lasalagaon) अंतर्गत येणाऱ्या विंचूर उपबाजार समितीसह निफाड बाजार समितीत कांद्याचे लिलाव सुरळीत सुरू झाले आहे. त्याचबरोबर व्यापाऱ्यांमध्ये आता दुफळी निर्माण झाल्याचे चित्र समोर येऊन लागले आहे. तर अशातच लासलगाव बाजार समिती देखील लवकरच सुरु होणार असल्याचे सूतोवाच बाजार समिती संचालकांनी दिले आहे. 


गेल्या 13 दिवसांपासून कांदा व्यापाऱ्यांनी (Onion Traders) कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द व्हावे, या व इतर मागण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती लिलाव बेमुदत बंद ठेवले होते. मात्र लासलगाव बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या विंचूर व निफाड या दोन उपबाजार समिती सुरू झाल्याने व्यापाऱ्यांमध्येच दुफळी निर्माण झाल्याचे चिन्ह दिसत आहे. नाशिक (Nashik Onion Farmers) जिल्हा कांदा व्यापारी असोसिएशनच्या गृपवर व्हॉईस मेसेजद्वारे कांदा लिलावात सहभागी झालेल्या कांदा व्यापाऱ्यांना मुंगसे येथील एका व्यापाऱ्याने शिवीगाळ व अपशब्द वापरल्याने विंचूर (Vinchur Bajar samiti) येथील व्यापाऱ्यांनी आज शेतकऱ्यांसमवेत येवला-नाशिक रस्त्यावर रास्ता-रोको आंदोलन केले होते. त्यामुळे व्यापारी वर्गात दुफळी निर्माण होत असल्याचे चित्र आहे.


दरम्यान, कांदा लिलाव बंद असल्याने शेतकऱ्यांसमोर मोठ्या अडचणी उभ्या राहत आहे. मका, बाजरी आदी काढणीसाठी तसेच द्राक्षांच्या छाटणीसाठी शेतकऱ्यांच्या हातात पैसे नाहीत, चाळीत साठवून ठेवलेले कांदे सडून चाललेले आहेत. शेतकऱ्यांच्या या नुकसानीस व्यापाऱ्यांचे आडमुठे धोरणच कारणीभूत ठरत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला भाव मिळावा, शेतकऱ्याच्या हाती दोन पैसे आले तरच भविष्यातील आर्थिक गणिते उभे करता येईल अशी प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.


लवकरच लासलगाव बाजार समिती सुरु होणार 


दरम्यान, येत्या 5 तारखेपासून आशिया खंडातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ असलेल्या लासलगाव बाजार समितीत देखील कांद्याचे लिलाव पूर्ववत सुरू होतील असे सूतोवाच बाजार समितीचे संचालक पंढरीनाथ थोरे यांनी केले आहे. एकूणच, नाशिक जिल्ह्यातील गेल्या १३ दिवसांपासून बेमुदत असलेल्या बाजार समित्यांमधील विंचूर पाठोपाठ निफाड बाजार समिती आज सुरू झाली, येत्या 5 तारखेला लासलगाव बाजार समितीत सुरू होणार असल्याचे सूतोवाच संचालक मंडळाकडून करण्यात आल्याने व्यापाऱ्यांमध्ये दुफळी निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.


इतर महत्वाची बातमी : 


Onion : व्यापारी मागण्यांवर ठाम, लिलाव बंदच राहणार; लवकरच खासगी कांदा मार्केट सुरु करणार