Grampachayat Election : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकांची (Grampanchayat Election) रणधुमाळी सुरु असून उत्तर महाराष्ट्रात (North Maharashtra) देखील 456 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक सुरु झाली आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिकसह नंदुरबार, धुळे, जळगाव, अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदान प्रक्रिया सुरु झाली आहे. यात जळगाव (jalgaon) जिल्ह्यात 167, अहमदनगर जिल्ह्यात 194, नाशिक जिल्ह्यात 43, धुळे जिल्ह्यातील 31, नंदुरबार जिल्ह्यातील १६ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रिया पार पडत आहे. 



नाशिक जिल्ह्यातील ग्रामपंचायतीसाठी आज मतदान 


नाशिक जिल्ह्यातील (Nashik District) 43 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक तसेच 15 ग्रामपंचायतींमधील सरपंच व सदस्यांच्या 18 रिक्त जागांसाठीच्या प्रचाराचा धुराळा शुक्रवारी सायंकाळी थंडावला. जिल्ह्यामध्ये 48 ग्रामपंचायतींमध्ये (Grampanchayat) सार्वत्रिक निवडणूकांचा कार्यक्रम सुरू आहे. अर्ज माघारीनंतर प्रत्यक्षरित्या 43 ग्रामपंचायतींमधील सदस्य पदांच्या 200 जागांसाठी तसेच 44 ठिकाणी थेट सरपंच पदासाठी लढत आहे. याव्यतिरिक्त 16 ग्रामपंचायतींमधील सदस्यांसाठीच्या 15 तसेच सरपंचाच्या तीन अशा एकुण 18 जागांकरीता पोटनिवडणूका होत आहेत. यासर्व ठिकाणी आज सकाळी साडेसात वाजेपासून मतदान सुरु झाले आहे. 


धुळ्यात भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी


धुळे जिल्ह्यातील (dhule) 31 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला होता. यापैकी पाच ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या असून उर्वरित 26 ग्रामपंचायतींसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. 31 पैकी 5 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून साक्री तालुक्यातील एक ग्रामपंचायत काँग्रेसकडे गेली असून शिरपूर तालुक्यातील दोन आणि शिंदखेडा तालुक्यातील दोन ग्रामपंचायती या भाजपकडे गेल्या आहेत. यात साक्री तालुक्यातील डांगरशिरवाडे ही काँग्रेसकडे. शिरपूर तालुक्यातील बभलाज आणि गिधाडे या 2 ग्रामपंचायती भाजपकडे गेल्या आहेत. आणि शिंदखेडा तालुक्यातील अंजनविहिरे आणि पथारे या ग्रामपंचायती देखील भाजपकडे गेल्या आहेत. जिल्ह्यातील तीनही तालुक्यांमध्ये भाजपा विरुद्ध महाविकास आघाडी ही लढत रंगली आहे. 


अहमदनगर जिल्ह्यात मतदानाला सुरुवात


अहमदनगर जिल्ह्यातील 194 ग्रामपंचायतसाठी निवडणूक जाहीर झाली होती, त्यापैकी 16 ग्रामपंचायत बिनविरोध झाल्या आहेत तर 178 ग्रामपंचायतसाठी आज प्रत्यक्षात मतदान होतं आहे. अहमदनगरच्या वडगावगुप्ता मतदान केंद्रावर सकाळपासून लगबग पाहायला मिळत आहे. महिला उमेदवारांनी हळदी कुंकू लावून एकमेकांना शुभेच्छा दिल्यात. अहमदनगर जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणूक मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासून मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह पाहायला मिळत आहे. दरम्यान वडगावगुप्ता मतदान केंद्रावर बुथ प्रमुख हे मतदान केंद्राच्या आत-बाहेर ये जा करत असल्याने पोलिसांनी त्यांना तंबी देत ये-जा करणं थांबविण्याची सूचना दिली आहे. सोबतच मोबाईल वापरण्यास बंदी असताना कुणी मोबाईल वापरल्यास करावाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. 


जळगाव जिल्ह्यात 167 ग्रामपंचायतीसाठी निवडणूक प्रक्रिया 


जळगाव जिल्ह्यात 1159 ग्राम पंचायती पैकी 167 ग्राम पंचायतीसाठीची निवडणूक प्रक्रिया आज पार पडत  आहे. यापैकी 16 ग्रामपंचायत या बिनविरोध झाल्या असल्याने 151 ग्रामपंचायतीसाठी आज मतदान होत आहे. आज सकाळपासूनच मतदारांनी मतदान करण्यासाठी मोठी गर्दी केली आहे. या निवडणुकीचा निकाल उद्या लागणार असून यामध्ये कोणता पक्षाकडे जनतेचा कौल दिसून येतो, हे पाहणे अधिक महत्वाचे राहणार आहे. या निवडणुकीच्या माध्यमातून मंत्री गुलाबराव पाटील, मंत्री गिरीश महाजन, मंत्री अनिल पाटील आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या प्रतिष्ठा पणाला लागल्या आहेत. मंत्री गुलाबराव पाटील सकाळी नऊ वाजता त्यांच्या पाळधी खुर्द गावात मतदान करणार आहेत. 


नंदुरबार जिल्ह्यातील 16 ग्रामपंचायतीच्या मतदानाला सुरुवात.


नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील 16 ग्रामपंचायत साठी आज सकाळी सात वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली असून, पहिल्या सत्रात मतदानाला चांगला प्रतिसाद दिसून येत असून मतदानाची टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात 16 ग्रामपंचायतच्या निवडणुका होत असून या निवडणुकीत भाजपाचे नेते आणि राज्याच्या आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावित, आमदार राजेश पाडवी व काँग्रेसचे माजी मंत्री आमदार के सी पाडवी, माजी मंत्री पद्माकर वडवी आणि जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुहास नाईक यांची प्रतिष्ठा पणाला लागली असून ही निवडणूक आगामी निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहिली जात आहे. भाजपच्या दोन दिग्गज नेत्यांच्या मतदारसंघात या निवडणुका असल्याने काँग्रेस किती ग्रामपंचायतींवर आपला झेंडा फडकवते हे पाहणे महत्वाचे ठरत. 


इतर महत्वाची बातमी :