नंदुरबार : जिल्ह्यात रोजगाराच्या संधी (Employment) नसल्याने दररोज रोजगाराच्या शोधात शेकडो परिवार स्थलांतर करत आहेत. दिवाळी सणानंतर येथील हजारो कुटुंब आपल्या चिमुकल्या मुलांसह शहराची वाट धरतात. रोजगारासाठी होणारं स्थलांतर (Nandurbar Migration) रोखण्यासाठी सरकार आणि शासन अनेक उपययोजना करतं मात्र या उपाययोजना अपुऱ्या पडत असल्याचं चित्र आहे.
नंदुरबार जिल्हा सातपुड्याचा पर्वतरांगांमध्ये वसलेला जिल्हा जिल्ह्यात कुठल्याही प्रकारचे उद्योगधंदे नसल्याने येथील आदिवासी बांधव वर्षातील आठ महिने रोजगाराचा शोधात गुजरात राज्यात स्थलांतर करतात. दिवाळीनंतर जिल्ह्यातून स्थलांतराला सुरुवात होत असते. मात्र यावर्षीचा अपुरा पाऊस यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान आणि स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने मुलं बाळांसह स्थलांतर होत असल्याचे चित्र दिसत आहे.
सुमनबाई वळवी म्हणतात, गावात कामधंदे नाही. रोजगार मिळत नाही. जी थोडी शेती आहे. ती पावसामुळे खराब झाली आहे. घरात पाच-सहा मुले आहेत. काम मिळालं तर त्यांना जेवण मिळेल नाहीतर ते उपाशी राहतील म्हणून आम्ही गाव सोडून जातो. गावात सरकारने कामधंदे उपलब्ध करून दिले तर आम्ही गुजरातला कशाला जाऊ? सध्या या गावात मोजक्या काही घरांमध्ये लोक राहत असल्याचं चित्र आहे. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध होत नसल्याने दरवर्षी येथील कुटुंब आपल्या मुलां बाळांसह शहराची वाट धरतात. दरवर्षी ऑक्टोबरमध्ये रोजगारासाठी गावाबाहेर पडलेली ही कुटुंब आता थेट मे महिन्याच्या अखेरीस पुन्हा आपल्या गावाकडे येतील.
मुलांचं शैक्षणिक नुकसान
कुटुंबांचा उदरनिर्वाह करण्यासाठी स्थानिक पातळीवर रोजगारच मिळत नसल्याने ही कुटुंब दरवर्षी महानगरांमध्ये स्थलांतरित होतात. या महानगरांमध्ये गेल्यावर हाताला मिळेल ते काम करून ही कुटुंबं आपला उदरनिर्वाह करतात. सात ते आठ महिने स्थलांतरित झाल्यावर येथील शाळेत जाणाऱ्या मुलांचं ही मोठं शैक्षणिक नुकसान होतं. दिवाळी नंतर कुटुंबासोबत जाणारी चिमुकली मुलं आपलं शिक्षण अर्ध्यावर सोडतात.
हजारो कुटुंबाचे स्थलांतर
ग्रामीण भागात रोजगारासाठी होणार स्थलांतर हा गंभीर प्रश्न असून हे स्थलांतर रोखण्यासाठी शासन आणि सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात. मात्र या योजनांचा पुरेपूर फायदा येथील तळागाळातील गरजू कुटुंबांना झालेला आजही दिसून येत नाही. त्यामुळे रोजगारासाठी होणाऱ्या स्थलांतराचा आकडा कमी होताना दिसत नसून रोजगार हमी योजना, स्थानिक पातळीवर तरुणांना रोजगारासाठी दिल जाणार कर्ज या योजनांचा बोजवारा उडालेला पाहायला मिळतोय. आज ही जिल्ह्यातील हजारो कुटुंब ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यात शहरांकडे स्थलांतरित होणारी ही कुटुंब थेट पाऊस सुरू होण्याच्या अगदी काही दिवस आधी आपल्या घराकडे वळतात. नंदुरबार जिल्ह्यात स्थलांतराचा प्रश्न अनेक वर्षापासून अनुत्तीर्ण आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि राजकीय नेते जिल्ह्यातील स्थलांतराचा प्रश्न शासन दरबारी मांडण्यात कुठेतरी कमी पडत असल्याचं दिसून येते.