Nashik : मागील सहा वर्षांत 211 खून, यंदा ऑगस्टपर्यंत 27 जणांना संपवलं, नाशिकच्या भल्यासाठी हे थांबलं पाहिजे!
Nashik News : नाशिकची गुन्हेगारी (Nashik Crime) गेल्या काही दिवसांत अवघड वळणावर गेल्याचे पाहायला मिळत आहे.
नाशिक : नाशिकची गुन्हेगारी (Nashik Crime) गेल्या काही दिवसांत अवघड वळणावर गेल्याचे पाहायला मिळत आहे. गुन्हेगारीच्या घटनांमुळे पोलिसांचा वचक कमी झालाच आहे, मात्र त्यांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यंदाच्या आठ महिन्यात नाशिकमध्ये जवळपास 27 खुनाच्या (Murder) घटना समोर आल्या आहेत. मागील वर्षांच्या तुलनेत यंदा गुन्हेगारी (Nashik) आटोक्यात असल्याचे नाशिक पोलिसांचे म्हणणे आहे.
नाशिक शहरासह जिल्ह्यात (Nashik District) वाढणारी गुन्हेगारी काही नवीन नाही. सातत्याने होत असलेले प्राणघातक हल्ले, लूटमार, खून या सारख्या घटनांनी नाशिक हादरत आहे. मात्र नाशिककरांना हे नेहमीचे झाल्याने आता सवयीचा भाग झाल्याचे चित्र आहे. शहर पोलिसांकडून सातत्याने गुन्हेगारांची धरपकड केली जात असताना दुसरीकडे गुन्हेगारी कमी होण्याची नाव घेत नाही. हीच रस्त्यावरील गुन्हेगारी आता सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामवरील (Instagram) भाईगिरी रस्त्यावर येऊन एकमेकांचा खून पाडण्यापर्यंत आली. त्यामुळे पोलिसांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.
दरम्यान नाशिक शहरात मागील पाच वर्षाचा आढावा घेतला असता यंदा मागील आठ महिन्यात खुनाच्या 27 घटना समोर आल्या आहेत. तर 2017 मध्ये 41 खून, 2018 मध्ये 35 खून, 2019 मध्ये 24 खून, 2020 मध्ये 25 खून, 2021 मध्ये 29 खून आणि 2022 मध्ये 30 खुनाच्या घटना घडल्याचे पोलीस आकडेवारीतून समोर आले. याचा अर्थ सर्वसाधारण वर्षाला 25 ते 30 खून होत असल्याचे निदर्शनास आले. यावरुन नाशिक शहरात गुन्हेगारी किती गंभीर होत चालली आहे, हे लक्षात येते. महत्वाचं म्हणजे अशा गंभीर घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग अधिक असल्याचे देखील दिसून येत आहे. एकीकडे पोलिसांकडून अशा गंभीर घटनांमध्ये तडीपारी, स्थानबद्धता, मोक्काच्या कारवायांमध्ये वाढ झाली. तरीही नाशिकची कायदा सुव्यवस्था रुळावर येत नसल्याचे चित्र आहे.
त्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नाशिक पोलिसांकडून (Nashik Police) चौकसभा, दामिनी पथक, नियंत्रण कक्ष, त्याचबरोबर नागरिकांसाठी थेट व्हॉट्सअॅप नंबर कार्यान्वित करण्यात आला आहे. तसेच पोलीस ठाणे अंतर्गत साप्ताहिक आढावा बैठक होत आहेत. सायबर गुन्हे रोखण्यासाठी सायबर दूतची निर्मिती करण्यात आली आहे. मात्र आता मागील पाच वर्षात झालेल्या गुन्ह्यांचा अभ्यास करुन गुन्हेगारांमधील ट्रेंड समजून घेऊन नाशिक पोलीस याबाबत कारवाई करत आहेत.
मागील सहा वर्षातील आकडेवारी
दरम्यान मागील सहा वर्षातील वेगवेगळ्या गुन्ह्यातील आकडेवारी लक्षात घेता 2017 मध्ये 41 गुण 20 जाळपोळ तोडफोडीच्या घटना एकूण गुन्ह्यांची आकडेवारी 3530, तर 2018 मध्ये 35 खून, 27 जाळपोळ तोडफोडीच्या घटना तर 3735 गुन्ह्यांची नोंद, 2019 मध्ये 24 खून, 34 जाळपोळ तोडफोडीच्या घटना तर 4061 गुन्ह्यांची नोंद, 2020 मध्ये 25 खून, 29 जाळपोळ तोडफोडीच्या घटना तर 3235 गुन्ह्यांची नोंद, 2021 मध्ये 29 खून, 19 जाळपोळ तोडफोडीच्या घटना तर 2844 गुन्ह्यांची नोंद, 2022 मध्ये 30 खून, 15 जाळपोळ तोडफोडीच्या घटना तर 3405 गुन्ह्यांची नोंद, तर यंदा ऑगस्ट महिन्यापर्यंत 27 खून, 15 जाळपोळ तोडफोडीच्या घटना आणि 2713 गुन्ह्यांची नोंद अशी एकूण आकडेवारी पोलिसांकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.