नाशिक : त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwer) हे खरं तर नाशिकचे वैभव समजले जाते. बारा ज्योतिर्लिंगांपैकी दहावे आणि आद्य ज्योतिर्लिंग (Jotirlinga) म्हणून त्र्यंबकेश्वर प्रसिद्ध असून श्रावण महिन्यात (Shravan) तर देशभरातून भाविक त्र्यंबकराजाच्या दर्शनासाठी येत असतात, मात्र याच ज्योतिर्लिंगाकडे जाणारी वाट खड्ड्यांमुळे बिकट बनली आहे. साधारण नाशिक-त्र्यंबकेश्वर या 30 किमी अंतरासाठी जवळपास 50 मिनिटे लागत असल्याचे वास्तव आहे. 


नाशिक त्र्यंबकेश्वर महामार्गाची (Nashik Trimbakeshwer Highway) अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी भले मोठे खड्डे (Potholes) पडले आहेत, कुठे धूळ तर कुठे रस्त्यावर खडीच खडी पसरली आहे.  रोज छोट्या मोठ्या अपघाताच्या घटनाही इथे समोर येतायत. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असूनदेखील रस्त्यांची ही परिस्थिती असल्याने हा चर्चेचा विषय ठरतोय. या खड्ड्यांमुळे भाविकांमध्ये प्रचंड संताप बघायला मिळतोय. रस्त्यावरील खड्डे जणू एखाद्या तळ्याप्रमाणे भासत असून नाशिक-त्र्यंबकेश्वर रोडवर असे एक नाही तर असंख्य खड्डे असून 10 ते 20 मीटर अंतरावरच 60 ते 70 असे खड्डे आहेत. विशेष म्हणजे सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसेंच्या नाशिकमध्येच रस्त्यांची ही दुरवस्था आहे. 


साधारण मागील वर्षी पाऊस (rain) जास्त असताना रस्त्याची परिस्थिती बरी होती, दोन तीन महिन्यापूर्वीच या रस्त्याचे काम झाले आहे. यंदा मात्र पाऊस कमी असताना देखील रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे अनेकदा अपघाताच्या घटनांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे एखाद्याच्या जीवाशी खेळण्यापेक्षा रस्त्याची योग्यरित्या डागडुजी झाली पाहिजे. यावर पालकमंत्री भुसे यांनी लक्ष देऊन काम करणे आवश्यक असल्याचे या रस्त्याने डेली अपडाऊन करणारे अरुण शेळके म्हणाले. त्र्यंबकेश्वर दर्शनासाठी आलो आहे, महाराष्ट्रात अनेक भागात रस्ते खराब आहेत. त्यापेक्षा आमच्या गुजरातमध्ये चांगले रस्ते आहेत. या रस्त्यांना केंद्र स्तरातून निधी येत असताना रस्त्याची अवस्था बिकट आहे. यावर लक्ष दिले पाहिजे, अशी प्रतिक्रिया  गुजरातहून आलेले भाविक राजेश पटेल यांनी दिली. त्र्यंबकेश्वर देवस्थान प्रसिद्ध आहे, मात्र रस्ते खूपच खराब झालेले आहे, याकडे लोकप्रतिनिधी कुणीच फिरकत नाही.. याकडे लक्ष द्यायला कोणी नाही, रस्त्याचा साहित्य चांगले वापरणे आवश्यक आहे. बाहेरच्या राज्यातील लोक आपल्याला नाव ठेवतात, अशी माहिती काळी पिवळी व्हॅनचालक मधुकर मोरे यांनी दिली. 


30 किमी अंतरासाठी 50 मिनिटे 


रस्त्यामुळे शारीरिक आजार जडण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे रस्ते चांगले होणे आवश्यक आहे. सरकार कोणतेही असो जनतेची कामे चांगल्या पद्धतीने होणं आवश्यक आहे. रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांचे हाल तर होतंच आहेत, मात्र पाठ, कंबर पुरते जाम होते आहे. त्यामुळे शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याची प्रतिक्रिया त्र्यंबकेश्वर येथील पुजारी अलोक जोशी यांनी दिली. एकूणच खड्ड्यांचा त्रास सहन करत, मान पाट एक करत मी त्र्यंबकला पोहोचलो आहे. खड्डे, धूळ यामुळे नाशिक त्र्यंबकेश्वर या 30 किमी अंतरासाठी 50 मिनिटे लागत आहेत. नाशिक त्र्यंबकरोडवरीलच नाही तर महाराष्ट्रातील खड्डे तात्काळ बुजवण्यासाठी प्रशासनाला, अधिकाऱ्यांना सद्बुद्धी देवो अशीच प्रार्थना मी आता त्र्यंबकराजाकडे करणार आहे. 


इतर महत्वाची बातमी : 


Trimbakeshwar News : भाविकांसाठी महत्त्वाची बातमी! श्रावण महिन्यात त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शनासाठी असं असणार टाईमटेबल