नाशिक : राष्ट्रवादीत (Nashik NCP) फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) आणि शरद पवार (Sharad Pawar) गटात राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेण्यावरून नाशिकमध्ये मोठा 'राडा' निर्माण झाला होता. अजित पवार आणि छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) समर्थकांनी राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेत शरद पवार गटाला कार्यालयात प्रवेश नाकारल्याने शरद पवार गटाच्या कार्यालयाचे काय होणार? असा प्रश्न नाशिककरांना पडला असतांना मुंबई नाका येथेच या गटाने एका रात्रीत शरद पवार गटाचे दुसरे कार्यालय उभारले आहे.


एकीकडे महाराष्ट्राचं राजकारण (Maharashtra Politics) अस्थिर असून काका पुतण्यामध्ये अद्यापही काही सुरु आहे का? अशी चर्चा सुरु आहे. दुसरीकडे स्थानिक पातळीवर मात्र शरद पवार गट आणि अजित पवार गट अशी दुफळी निर्माण झालीच आहे. नाशिकमध्ये तर या दुफळीचा जोरदार राडा पाहायला मिळाला होता. त्यामुळे नाशिकमध्ये राष्ट्रवादी चांगलीच चर्चेत आली होती. त्यावेळी राष्ट्रवादी भवन कोणाकडे जाणार यावरून वाद रंगला होता. तो थेट शरद पवारांपर्यंत जाऊन पोहचला होता. अशातच शरद पवार समर्थकांनी आता पक्षाचे अधिकृत असलेले तीन मजले हायटेक कार्यालय मिळत नसल्याचे बघून 100 मीटर अंतरावर असलेल्या एका भूखंडावर तंबू ठोकत नवीन कार्यालयाचा डेरा उभारला आहे.


राष्ट्रवादीतील अजित पवार (Ajit Pawar) गटाने सरकारमध्ये सामील होत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. यानंतर महाराष्ट्रासह नाशिकमध्ये राष्ट्रवादीच्या फुटीवरून जोरदार कलगीतुरा रंगला. त्यातच शरद पवार येवला सभा दौऱ्यावर असताना नाशिकमध्ये राष्ट्रवादी कार्यालयावरून राडा झाला. त्यानंतर मुंबईनाका परिसरामध्ये असलेल्या कार्यालयाचा ताबा अजित पवार गटाकडे गेला. दोन्ही गट आमने-सामने आल्याने मोठा तणाव निर्माण झाला होता. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त असल्याने अनर्थ टळला तर कार्यकर्त्यांना शांत करण्यास पोलिसांना यश आले. दरम्यान, भुजबळ गटाने राष्ट्रवादी भवनाचा ताबा घेतल्यापासून या कार्यालयात शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना एन्ट्री नसल्याने पक्ष पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका खासगी ठिकाणीच होत होत्या. आता शरद पवार गटाने आगामी निवडणुका लक्षात घेत पक्ष विस्तार आणि कार्यकर्त्यांसोबत संवाद साधण्यासाठी नवीन कार्यालयाचा तंबू ठोकला आहे.


पक्षाचा विस्तार करण्यावर भर 


नाशिक जिल्ह्यात शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. मात्र, अजित पवार यांनी समर्थकांना आमदारपदी संधी देत राजकीय वर्चस्व वाढवले. पक्षाचे हायटेक कार्यालय अजित पवार यांच्याकडे गटाकडे गेल्यानंतर तंबू ठोकून तेथे शरद पवार गटाचे पदाधिकारी व कार्यकर्ते कामकाज करणार आहेत. त्यामागील सहानुभूतीचे राजकारणही चर्चेत आले आहे. पक्षाचे जुने कार्यालय हे राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या नावे असून पोलिसांच्या मदतीने अजित पवार यांचे समर्थक तेथे काम करत आहेत. त्यांच्याकडे सर्व मॅनेज पदाधिकारी तर आमच्याकडे निष्ठावंत शरद पवार समर्थक आहेत. तंबूत कार्यालय बनवूनदेखील पक्षाचा विस्तार करू असा विश्वास शहराध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Zero Hour : पवारांच्या बीडमधील भाषणाचा अर्थ ते महिलांविरोधात वाढते गुन्हे सविस्तर चर्चा