(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ललित पाटील प्रकरणात धक्कादायक माहिती समोर; नाशिकच्या गिरणा नदीत सापडलं कोट्यवधींचं ड्रग्ज तर मध्यरात्रीपासून शोधमोहीम
मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक दाखल झाले आहे.
नाशिक: ड्रग्ज माफिया (Drug Case) ललित पाटील (Lalit Patil) ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलीसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई नाशिकमध्ये केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे.
ललित पाटीलचा साथीदार सचिन वाघ याने नाशिक कारखानामध्ये बनविलेले ड्रग्ज नष्ट करण्याच्या हेतून गिरणा नदीपात्रात फेकून दिले होते. सचिन वाघच्या तपासात ही माहिती उघडकीस आल्यानंतर मुबंई पोलीस सचिन वाघसह नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. मध्यरात्री अडीच वाजता देवळा तालुक्यातील ठेंगोडा गावाजवळील नदीपात्रात शोध मोहीम सुरू केली. पोलिसांच्या मदतीला रायगडमधील प्रशिक्षित स्कुबा डायव्हिंगचे पथक दाखल झाले आहे. मध्यरात्रीपासून सुरू झालेले शोधकार्य आतापर्यंत सुरू आहे.
तब्बल 15 किलो md ड्रग्ज हस्तगत
आतापर्यंत दोन गोण्या सुमारे 50 किलो ड्रग्ज नदी पात्रात फेकल्याच सचिन वाघ ने पोलिसांना तपासादरम्यान सांगितल्याची माहिती आहे. कमेराच्या माध्यमातून ड्रग्जचा शोध घेण्यात आला, मात्र पाणी साधारण 15 ते 20 फूट खोल असल्यानं ड्रग्जचा साठा अद्याप बाहेर काढण्याच काम सुरू आहे. तर जवळच असणाऱ्या सरस्वतीवाडी भागातून 15 किलो md ड्रग्ज हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. कोट्यवधी रुपयांच ड्रग नष्ट करण्याचा प्रयत्न सचिन वाघ याने केला होता मात्र मुबंई पोलिसांनी त्याचा छडा लावला आहे.
सचिन वाघ 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या कोठडीत
सध्या ललित पाटील आणि सचिन वाघ 27 ऑक्टोबरपर्यंत पोलिसांच्या कोठडीत आहे. ललित पाटीलला ससून रुग्णालयातून पळून जाण्यासाठी साथीदार ड्रायव्हर सचिन वाघ याने मदत केली होती. ललित पाटील यांच्या सांगण्यावरून सचिन वाघने ड्रग्ज लपवले किंवा त्याचे विल्हेवाट लावली आहे, असा पोलिसांना संशय आहे.
पोलीसांचा तपास सुरू
ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात नाशिकच्या शिंदे गावात मुंबई पोलिसांनी ड्रग्ज कारखाना उध्वस्त केला आणि त्यानंतर सोलापूर, संभाजीनगर, पालघर, पुणेसह अनेक जिल्ह्यात पोलिसांनी छापे टाकत एम डी ड्रग्ज आणि अवैध धंद्यांविरोधात कारवाई करत कोट्यवधींचा माल हस्तगत केल्याने राज्यभर खळबळ उडाली आहे. नाशिकच्या अंमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हे शाखेने मागील दोन आठवड्यात 12 ड्रग्ज पेडलरला अटक केली असून यातील एक आरोपी हा मुंब्राचा, एक कल्याणचा तर बाकी नाशिक मधीलच रहिवासी आहेत त्यांचे आणखी साथीदार असण्याची शक्यता आहे. यातील अनेक पेडलर हे सराईत गुन्हेगार आहेत, कोणावर खून तर कोणावर प्राणघातक हल्ले, घरफोडी, मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. त्यांनी हे ड्रग्ज कुठून आणले ? कोणाला विकले ? यासोबतच ललित पाटील, भूषण पाटील तसेच अभिषेक बलकवडे यांच्या हे संपर्कात होते का ? या दिशेने देखील पोलीसांचा तपास सुरू आहे.
हे ही वाचा :