Nashik : शिंदे गटाकडे ढाल तलवार चिन्ह, म्हणजे ऑफेन्स-डिफेन्स दोन्हीही : मंत्री गिरीश महाजन
जनता कुणाच्या बाजूने, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आणि शिवसैनिक खऱ्या अर्थाने कुणाच्या बाजूने आहेत हे दोन्ही पक्षांमध्ये एकदा लढत झाल्यावर आपल्या समोर येईल असं मंत्री गिरीश महाजन म्हणाले.
नाशिक : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाले असून ऑफेन्स आणि डिफेन्स या दोन्ही गोष्टी होणार आहेत, आता जनता, शिवसैनिक कुणाच्या बाजूने जाणार हे दोन्ही गटातील निवडणूक लढत झाल्यावर समोर येईल, असे स्पष्ट मत मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले आहे.
मंत्री गिरीश महाजन हे त्र्यंबकेश्वर दौऱ्यावर आले असता त्यांनी त्र्यंबक राजाचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी ठाकरे आणि शिंदे गटाच्या पक्ष चिन्हावर प्रतिक्रिया दिली. यावेळी ते म्हणाले की, "शिंदे गटाकडे ढाल तलवार तर ठाकरे गटाकडे मशाल आहे. खरं तर जनता कुणाच्या बाजूने, मतदारांचा कौल कोणाच्या बाजूने आणि शिवसैनिक खऱ्या अर्थाने कुणाच्या बाजूने आहेत हे दोन्ही पक्षांमध्ये एकदा लढत झाल्यावर आपल्या समोर येईल."
गिरीश महाजन पुढे म्हणाले, "समाधानाची बाब आहे की, शिंदे गटाला ढाल तलवार चिन्ह मिळाले. यावर सर्वांनी समाधान व्यक्त केले. ढाल तलवार म्हणजे ऐतिहासिक काळापासून महत्वाचे आहे. शिवाजी महाराजांपासून ते स्वातंत्र्य संग्रामात ढाल तलवार वापरण्यात आले आहे. तर आता लोकांच्या मनामध्ये काय जनतेच्या मनामध्ये काय मतदारांना काय पाहिजे आहे. त्यापेक्षा मला वाटतं जनतेच्या मनात काय त्यांना काय वाटतं आता हे लवकरच स्पष्ट होईल, अशी भूमिकाही त्यांनी यावेळी मांडली.
मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी विविध विषयांवर मत व्यक्त केले. पालघर हत्याकांड झालेल्या घटनेची चौकशी सीबीआयकडे वर्ग करण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी चौकशी साठी तीन चार वर्षाचा काळ खूप झाला, लवकर चौकशी व्हायला पाहिजे. तसेच आगामी एमसीए निवडणुकीत वाद नाहीत. शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी तिन्ही पक्ष लढत आहोत. शिवाय खेळात राजकारण नसलं तेच बर. मी स्वतः क्रीडा मंत्री आहे,
खेळासारख्या ठिकाणी राजकारण नकोच, असेही ते म्हणाले.
तीर्थक्षेत्रांचा विकास...
मोदी सरकारच्या काळात सगळ्या तीर्थक्षेत्र ठिकाणी विकास होत आहे. देशभरात शिवमंदिर आहेत, ते विकसित करण्यात येत आहे. शिवलिंगाचे पूजन करत आहोत. आज उज्जैन येथे आगळावेगळा कार्यक्रम होत असून या ठिकाणाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी संबोधित करणार आहेत. देशभरात मोठी तीर्थक्षेत्र आहेत, त्या ठिकाणी विकास सुरू झाला आहे. जगभरातले भाविक भेटी देत आहेत.