Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या शिवकालीन दशभुजा गणपतीचा दोन वेळा जीर्णोद्धार, अशी आहे आख्यायिका!
Nashik Dashbhuja Ganesh : नाशिकच्या पंचवटी भागातील गोरेराम लेन परिसरात दशभुजा गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. या मंदिराला शिवपूर्वकालीन इतिहास लाभलेला आहे. या गणेशाचा आख्यायिका फारच रंजक आहे.
Nashik Dashbhuja Ganesh : शिवकालीन असलेल्या दशभुजा गणेशाची त्यावेळी हनुमानाची मूर्ती म्हणून पूजा होत असे, मात्र काही नागरिकांनी मूर्तीवरील शेंदूर हटवला असता ही दशभुजा गणेशाची मूर्ती असल्याचे निदर्शनास आल्यानंतर विधिवत गणेशाची पूजा करण्यात येऊ लागली, अशी आख्यायिका दशभुजा गणेशाची सांगितली जाते.
नाशिक (Nashik) शहराला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. शहरात अनेक भागात मंदिरेच मंदिरे पाहायला मिळतात. त्यात गणेश मंदिराचा वेगळाच इतिहास वाचायला मिळतो. नाशिकच्या पंचवटी भागातील गोरेराम लेन परिसरात दशभुजा गणेशाचे मंदिर पाहायला मिळते. आजही हे मंदिर सुस्थितीत आहे. या गणेशाची स्थापना 1623 मध्ये झाल्याचे मंदिराबाहेरील एका शिलालेखावरुन समजते. म्हणजेच या मंदिराला शिवपूर्वकालीन इतिहास लाभलेला आहे.
नाशिक शहरातील रविवार कारंजावरील चांदीच्या गणपतीमागे गोरेराम मंदिर लेन भागात हे मंदिर असून दशभुजा गणपती देवस्थान अतिशय पुरातन असून त्याचे इतिहास आणि स्थान प्राचीन असल्याचे सांगण्यात येते. 1623 मध्ये स्थापना झालेला नाशिकचा मानाचा गणपती म्हणून ओळखला जातो. दहा हात असलेली गणेशाची मूर्ती अतिशय भव्य असून मूर्तीच्या वरील बाजूस पद्मावती अशी अक्षरे कोरलेली आढळून येतात.
स्वातंत्र्यानंतर नाशिकच्या गोरेराम मित्रमंडळाने गणेश उत्सव सुरु केला. साधारण 100 वर्षांपासून माघी गणेश जयंती उत्सव मंदिर परिसरात होत आहे. दरम्यानच्या काळात म्हणजेच 2000 साली मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला. त्यानंतर 2004 साली पुन्हा गोरेराम मित्र मंडळाच्या वतीने जीर्णोद्धार करण्यात आल्याचे गोरेराम मित्र मंडळाचे बापू दापसे यांनी सांगितले. तदनंतर आतापर्यंत गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे.
अशी आहे दशभुजा गणेश मूर्ती
दशभुजा गणेशाची खडकावर अखंड पाषाणात अत्यंत रेखीव दशभुजा असलेली मूर्ती आहे. उभी मूर्ती असल्याने अतिशय सुरेख आणि विलोभनीय दिसते. खालच्या बाजूस गणपतीकडे पाहणारा उंदीर असून लोकांना फारसा परिचित नसला तरी दशभुजा ही गणेश मूर्ती उत्तर महाराष्ट्रातील एकमेव असल्याचे सांगण्यात येते.
गोरेराम मित्र मंडळाचे विविध उपक्रम
गेल्या 100 वर्षांपासून कार्यरत असलेले गोरेराम मित्र मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबविण्यात आले आहेत. यामध्ये युवक युवकांसाठी विविध स्पर्धा, स्पर्धा परीक्षा, शिबीर, त्याचप्रमाणे ज्येष्ठांसाठी आरोग्य शिबीरे. कोरोना काळात मित्र मंडळाचे काम अतिशय स्तुत्य असून लॉकडाऊनच्या सुरुवातीपासून नागरिकांना मार्गदर्शनासह कोरोना काळात भरीव मदत केल्याचे दिसून येते.