Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!
Nashik Crime News : पंचवटीतील हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी तब्बल ३६ लाख ७० हजार रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.
![Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले! Nashik Crime software engineer cheated of 37 lakhs by luring Share Market Maharashtra Marathi News Nashik Crime : नाशिकच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरला दाखवलं शेअर मार्केटचं आमिष, सायबर भामट्यांनी तब्बल 37 लाख उकळले!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/d94e1d8ac1038891d848957881c9fe0b1719922471955923_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
नाशिक : गेल्या काही दिवसांपासून शहरात सायबर फसवणुकीच्या घटना वाढत चालल्या आहेत. आता नाशिकमधून (Nashik Fraud News) पुन्हा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पंचवटीतील (Panchavati) हिरावाडी परिसरात राहणाऱ्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला सायबर चोरट्यांनी तब्बल ३६ लाख ७० हजार रुपयांचा गंडा (Fraud) घातल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. याबाबत सायबर पोलीस ठाण्यात (Cyber Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार हे सॉफ्टवेअर इंजिनिअर असून त्यांना 19 मार्च ते 15 मे २०२४ या कालावधीत सायबर ऑक्टोपस स्टॉक-ए-8 चा टेलिग्राम व व्हाट्सअॅप ग्रुप ऑपरेट करणारे अॅडमिन, प्रोफेसर रोहन कुलकर्णी आणि राजेश पंडीत (असिस्टंट) याने मोबाईलवरून संपर्क साधला.
अधिक परताव्याचे दाखवले आमिष
त्यानंतर तक्रारदारांना शेअर मार्केट ट्रेडिंग, ब्लॉक ट्रेडिंग, आयपीओची माहिती देऊन त्यांचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानुसार संशयितांनी त्यांना लाझर्ड आयएनडी हे ट्रेडिंग अॅप डाऊन लोड करण्यास सांगितले. ते केले असता बऱ्याच गोष्टींवर परताव्यावर विश्वास बसल्याने तक्रारदाराने सुरुवातीला काही रक्कम गुंतविली.
36 लाख 70 हजारांची फसवणूक
यानंतर तक्रारदाराला आभासी स्वरुपात पैशांचा परतावा दर्शविण्यात आला. त्यामुळे तक्रारदाराचा अधिक विश्वास बसला आणि त्यांनी आणखी रक्कम गुंतवली. त्यानुसार ते सायबर चोरट्यांच्या जाळ्यात फसत गेले. तक्रारदाराने तब्बल 36 लाख 70 हजार रुपये गुंतविले. मात्र, अनेक दिवस उलटूनही परतावा न मिळाल्याने त्यांना संशय आला. संशयितांसोबत संपर्क होत नसल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांना काही दिवसांनी समजले.त्यानुसार तक्रारदाराने सायबर पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
नाशिकच्या चौघांना गमावले 95 लाख
दरम्यान, नाशिकमध्ये काही दिवसांपूर्वीच जादा नफ्याच्या आमिषाने नाशिकच्या चार जणांनी सुमारे 95 लाख रुपये गमावल्याचे समोर आले आहे. शेअर मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी फिर्यादीसह साक्षीदारांना सुमारे 95 लाख रुपयांचा ऑनलाईन गंडा घातल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे, आपली सायबर फसवणूक होऊ नये, याची काळजी घ्यावी, असे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)