(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Crime News : नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज पुरवठादाराला अटक, पाथर्डी शिवारातील कारवाईनंतर होता फरार
Nashik News : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात पुन्हा एमडी ड्रग्ज सापडले होते. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. आता सराईत गुन्हेगारांना एमडी ड्रग्ज पुरवणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे.
Nashik MD Drugs नाशिक : दोन दिवसांपूर्वी नाशिक शहरात पुन्हा एमडी ड्रग्ज (MD Drugs) सापडले होते. या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी अटक केली होती. आता सराईत गुन्हेगारांना एमडी ड्रग्ज (MD Drugs Case) पुरवणाऱ्यास जेरबंद करण्यात आले आहे. गुन्हे शाखेच्या युनिट एकने ही कारवाई केली आहे.
संशयित पुरवठादाराचे नाव अनंत जायभावे (Anant jaybhave) असे आहे. गुरुवारी पाथर्डी शिवारात (Pathardi Shivar) केलेल्या कारवाईनंतर जायभावे फरार झाला होता. मात्र गुन्हे शाखेच्या युनिट एकने त्याला मोठ्या शिताफीने अटक केली आहे.
पाथर्डी शिवारातून दोघांना अटक
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पाथर्डी शिवारात एमडी ड्रग्जची विक्री होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार गुरुवारी गुन्हे शाखेच्या युनिट एकने निखिल पगारे व कुणाल ऊर्फ घाऱ्या घोडेराव या दोघांना अटक केली होती.
एक लाखाचे एमडी ड्रग्ज जप्त
यापैकी निखिल हा सराईत गुन्हेगार असून, त्याचा टिप्पर गँगशी संबंध आहे. दरम्यान या संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीचे २० ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. संशयितांना एमडी ड्रग्ज पुरविणारा संशयित अनंत जायभावे हा गुन्हा दाखल झाल्यापासून फरार झाला होता.
संशयित जायभावेचा शोध केला सुरु
या प्रकरणी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉ. सीताराम कोल्हे यांनी विशेष पथकाला मार्गदर्शन केले होते. यानंतर गुन्हे शाखा युनिट एकतर्फे संशयित जायभावेचा शोध सुरु होता. त्याच्या संदर्भातील माहिती अंमलदार राहुल पालखेडे यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळाली.
जायभावेला घेतलं ताब्यात
संशयित अनंत जायभावे हा नाशिकरोडच्या बीएमएस मार्केट येथे असल्याचे कळले. यानंतर अंमलदार पालखेडे यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय ढमाळ यांना सांगितले. पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने शिताफीने अनंत सर्जेराव जायभावे (३०, रा. स्वामी समर्थ नगर, जत्रा हॉटेलच्या मागे, आडगाव) याला ताब्यात घेण्यात आले.
चौकशीत गुन्ह्याची कबुली
अनंत जायभावेची कसून चौकशी करण्यात आले. यावेळी त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पुढील चौकशीसाठी अनंत जायभावेला अमली पदार्थ विरोधी पथकाच्या ताब्यात दिले आहे. त्यांच्या या चौकशीत आणखी काही खुलासे होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आणखी वाचा