(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Citylink Bus Strike : सिटीलिंक बस वाहकांचा संप अखेर मागे, थकीत वेतन देण्याचे प्रशासनाकडून आश्वासन
Nashik Citylink Bus Strike : 31 मार्चपर्यंत थकीत वेतन अदा केले जाणार असल्याचे सिटीलिंक प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याने सिटीलिंक बस वाहकांनी संप अखेर मागे घेतला आहे.
Nashik Citylink Bus Strike : महापालिकेच्या वतीने भविष्य निर्वाह निधीची एक कोटी रक्कम तसेच थकीत 65 लाख रुपये वेतन अदा केल्यानंतरही वाहक व चालकांनी संप आठव्या दिवशीही सुरूच ठेवला होता. मात्र 31 मार्चपर्यंत थकीत वेतन अदा केले जाणार असल्याचे सिटीलिंक प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आल्याने हा संप मागे घेण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच नाशिकची सिटीलिंक बससेवा (Nashik Citylink Bus Service) पुन्हा एकदा सुरळीत होणार आहे.
महापालिकेच्या सिटिलिंक कंपनीकडून शहरात बस चालविल्या जातात. सिटीलिंकने वाहक पुरविण्याचे काम मॅक्स डिटेक्टिव अँड सिक्युरिटीज या कंपनीला दिले आहे. गेल्या दोन वर्षांत मॅक्स कंपनीवर मोठ्या प्रमाणात दंडाची रक्कम आकारण्यात आली आहे. ही रक्कम माफ करण्यासाठी कंपनीने वाहकांचे वेतन अडविले होते. वेतन थकविल्याने वाहकांना दोन वर्षात तब्बल नऊ वेळा संप पुकारण्याची वेळ आली आहे.
210 बसेस होत्या बंद
गेल्या आठ दिवसांपासून वाहकांचा संप सुरू होता. शहरातील 250 पैकी तब्बल 210 बसेस बंद होत्या. यामुळे शहराची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडल्याचे चित्र होते. त्याचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदार घेताना दिसून आले. बुधवारी वाहक पुरवठादार व वाहक संघटनांच्या प्रतिनिधींची पुन्हा बैठक झाली. त्यात महापालिकेने पुढाकार घेत वेतनाचे 65 लाख रुपये पुरवठादार कंपनीच्या बँक खात्यात जमा केले. तर ग्राहकांचे थकीत भविष्य निर्वाह निधीची एक कोटी रुपयांची रक्कमही अदा केली. मात्र वाहक चालकांच्या संघटनेने थकीत वेतन पूर्णपणे देण्याची मागणी कायम ठेवत संप चालूच ठेवण्याचा निर्णय घेतला होता.
अखेर सिटीलिंक वाहकांचा संप मागे
आता 31 मार्चपर्यंत थकीत वेतन अदा केले जाणार असल्याचे सिटीलिंक प्रशासनाकडून आश्वासन देण्यात आले. त्यामुळे वाहकांनी आपला संप मागे घेतला आहे. नाशिक महापालिकेत ठेकेदाराच्या उपस्थित झालेल्या बैठकीत संपकऱ्यांना हे आश्वासन देण्यात आले आहे. संप काळात कोट्यवधीचे नुकसान सिटी लिंक प्रशासनाचे झाले आहे.
आठ दिवसात 15 हजारांहून अधिक फेऱ्या रद्द
सिटीलिंक कंपनीच्या बस बंद असल्याने मागील आठ दिवसांत सुमारे पंधरा हजार पाचशे फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. यातून सिटीलिंक कंपनीला दररोज साडेआठ लाख याप्रमाणे ६० लाख रुपयांहून अधिक तोटा सहन करावा लागला आहे.
आणखी वाचा