(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik News : नाशिकला जानेवारीत राजकीय नेत्यांची मांदियाळी; मोदी, शाह, शिंदे, ठाकरेंसह अनेक नेत्यांच्या सभा
Nashik : भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सध्या नाशिकवर लक्ष केंद्रित केले आहे. जानेवारीत नाशिकमध्ये अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येणार आहे.
Nashik News : लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Elections 2024) पडघम वाजायला आतापासूनच सुरुवात झाली आहे. भाजप, शिवसेना शिंदे गट, ठाकरे गट, राष्ट्रवादी, काँग्रेससह सर्वच राजकीय पक्षांनी सध्या नाशिकवर (Nashik) लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे. जानेवारीत नाशिकमध्ये अनेक राजकीय नेत्यांची मांदियाळी दिसून येणार आहे. जानेवारीत नाशिकमध्ये अनेक राजकीय नेत्यांच्या जाहीर सभा देखील होणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे रणशिंग येथील मैदानातूनच फुंकले जाणार, असे यावरून दिसून येत आहे.
जानेवारीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह, गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, शिवसेना (उबाठा) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या सभा नाशिकमध्ये पार पडणार आहेत. मुंबई, पुण्यानंतर आता नाशिक हे राजकीय घडमोडींचे प्रमुख केंद्र बनत असल्याचे पाहायला मिळत आहे.
पंतप्रधान मोदी १२ जानेवारीला नाशकात (Prime Minister Narendra Modi)
यंदा सर्वच राजकीय पक्षांनी महाराष्ट्र काबीज करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. २२ जानेवारीला अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळयापूर्वी भारतीय जनता पार्टीने नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत युवा संमेलनाचे आयोजन केले आहे.
या संमेलनासाठी पंतप्रधान मोदी नाशिकमध्ये दाखल होणार आहेत.राज्यातील ४५ हून अधिक जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत रामाच्या भूमीतूनच भाजप प्रचाराचा नारळ फोडण्याचे नियोजन असून त्यासाठीच नाशिकची निवड करण्यात आल्याचे समजते. तसेच गृहमंत्री अमित शह सहकार संमेलनाच्या निमित्ताने नाशिकमध्ये येणार आहेत.
शिंदेंची यात्रा अन् ठाकरेंचे महाअधिवेशन (Eknath Shinde and Uddhav Thackeray)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आता राज्यभर दौरे करणार आहेत. त्यांची यात्रा जानेवारी महिन्यांत नाशिकमध्ये धडकणार आहे. या पार्श्वभूमीवर सभेचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचे महाअधिवेशन २२ आणि २३ जानेवारीला पार पडणार आहे.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये १९९४ साली शिवसेनेचे (Shiv Sena) अधिवेशन झाले होते. त्यानंतर राज्यात शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते. आता नाशिकमधील अधिवेशन ऐतिहासिक करण्याचा शिवसेना ठाकरे गटाचा (Shiv Sena Thackeray Group) प्रयत्न असल्याचे दिसून येते. कार्यकर्ते या मेळाव्यासाठी आतापासूनच जय्यत तयारी करत असल्याचे दिसून येत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवारही नाशिकमध्ये (Devendra Fadnavis and Ajit Pawar)
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस लवकरच प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. फेब्रुवारीपासून त्यांच्या दररोज तीन सभांचे आयोजन केले जात आहे. फडणवीस नाशिकमध्ये आयोजित युवा संमेलनाला देखील उपस्थित राहणार आहेत. १६ जानेवारीच्या समारोप सोहळ्यालाही ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असतील. फेब्रुवारीत नाशकात त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील ४ जानेवारी रोजी नाशिकला येणार आहेत. एका खासगी कार्यक्रमानिमित्त ते नाशिक (Nashik) दौऱ्यावर असतील.
आणखी वाचा