Nashik Lok Sabha Constituency : भाजप (BJP) आणि मनसेची (MNS) युती होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघावर  याआधी शिवसेना शिंदे गट आणि भाजपाकडून दावा करण्यात आला आहे. आता राज ठाकरे (Raj Thackeray) आणि अमित शाह (Amit Shah) यांच्यात झालेल्या बैठकीत मनसेकडून नाशिकची जागा मागण्यात आल्याची चर्चा आहे. यामुळे महायुतीची धाकधूक वाढल्याचे चित्र आहे. 


नाशिकची जागा मनसेला गेल्यास भाजपचा दावा खोडला जाणार असल्यामुळे केंद्र आणि राज्य पातळीवर मनसेचे महायुतीत स्वागत होत असताना स्थानिक पातळीवर मात्र भाजपमध्येही नाराजीचा सूर असल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधानपदावर विराजमान करण्यासाठी 'अबकी बार ४०० पार' असा नारा दिला आहे. राज्यातील ४८ पैकी ४५ जागा महायुती जिंकेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी केला आहे. त्यादृष्टीने महायुतीकडून तयारी केली जात आहे. शिवसेनेच्या ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची सहानुभूती कमी करण्यासाठी भाजपकडून मनसेला महायुतीत सामावून घेण्याची खेळी करण्यात येत आहे.  


नाशिकवर मनसेचा दावा


त्याचाच एक भाग म्हणून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दोन दिवसांपूर्वी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राज्यात परतल्यानंतर त्यांनी शिंदे आणि फडणवीसांच्या भेटीगाठी वाढविल्या. गुरुवारी राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक राज ठाकरे यांनी घेतली. त्यात नाशिकमधील पदाधिकाऱ्यांनाही आमंत्रित केले होते. या बैठकीत राज ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीसाठी सज्ज राहण्याच्या सूचना दिल्याचे समजते. राज ठाकरे यांनी भाजपकडे नाशिक, शिर्डी आणि मुंबईतील एक अशा तीन जागांचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त आहे.  भाजप राज ठाकरेंना दोन जागा देण्याची शक्यता आहे. नाशिक हा कधीकाळी मनसेचा गड मानला जात होता. त्यामुळे कमबॅक करण्यासाठी नाशिकवर मनसेचा दावा राहणार आहे. 


गोडसेंच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह 


तसेच दक्षिण मुंबईची जागा नाकारली गेल्यानंतर बाळा नांदगावकर यांच्यासह शिर्डीची जागा मनसेने मागितली असल्याची चर्चा आहे. या दोन्ही जागांवर शिंदे सेनेचा मूळ दावा असल्यामुळे या जागा मनसेला मिळाल्यास शिंदे सेनेतील इच्छुकांचे काय होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नाशिकमधून खासदार हेमंत गोडसे यांची उमेदवारी श्रीकांत शिंदे यांनी जाहीर केल्यामुळे आता गोडसेंच्या उमेदवारीबाबत प्रश्न उभा राहिल्याने सेनेत अस्वस्थता पसरल्याचे चित्र आहे. 


दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ? 


नाशिकच्या जागेवरून भाजप, शिंदे सेनेत रस्सीखेच सुरू आहे. आता मनसेच्या एन्ट्रीमुळे दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत. भाजपनेदेखील नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी कंबर कसली आहे. आता ती जागा मनसेला मिळाल्यास भाजपमधील नाराजीचा फटका निवडणुकीत बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.


आणखी वाचा 


Pankaja Munde In Beed : बीडच्या निवडणुकीत मराठा आरक्षणाचा फॅक्टर निर्णायक ठरेल का? पंकजा मुंडे स्पष्टच म्हणाल्या...