Nashik News नाशिक : खामखेडा (Khamkheda) येथील बुटेश्वर शिवारात डोंगराला लागून असलेल्या शेततळ्यात पाणी पाहण्यासाठी गेलेल्या दोघा सख्या भावांचा पाय घसरून पडल्याने शेततळ्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.  


याबाबत अधिक माहिती अशी की, खामखेडा गावातील बुटेश्वर शिवारातील गणेश संतोष आहेर हे डोंगराला लागून असलेल्या शेतात राहतात. त्यांची दोन्ही मुलं तेजस आहेर व मानव आहेर हे आई-वडिलांना मदतीसाठी शेतात गेले होते. दुपारच्या सुमारास जंगलातून शेतात आलेल्या वानरांना हुसकावण्यासाठी ते त्यांच्या पाठीमागे गेले होते. 


पाय घसरल्याने दोन्ही भाऊ पडले शेततळ्यात


वानरे हुसकून आल्यानंतर जंगलाला लागून असलेल्या सदाशिव शेवाळे यांच्या शेततळ्यात ते पाणी पाहण्यासाठी गेले. यावेळी मोठा भाऊ तेजस याचा पाय घसरल्याने तो शेततळ्यात पडला. त्याला वाचवण्यासाठी मानव याने हात दिला. मात्र तोही शेततळ्यात घसरला. 


पाण्यात बुडाल्याने दोघांचा दुर्दैवी मृत्यू


त्यांच्यासोबत असलेल्या चार वर्षीय बहिणीने शेतात पळत येत काकांना याबाबत माहिती सांगितली. शेतात कांदे काढणी करत असलेले केदा आहेर व इतरांनी शेततळ्याकडे धाव घेतली. शेजारील शेतकरी हरेश शेवाळे यांनी शेततळ्यातून दोघा मुलांना बाहेर काढले. मात्र दोघांचाही बुडून मृत्यू झाला. 


गावात हळहळ 


तेजस आहेर हा खामखेडा येथील जनता विद्यालयात इयत्ता सहावीत तर मानव आहेर हा जिल्हा परिषद शाळा थळवस्ती येथे इयत्ता दुसरीत शिकत होते. गणेश आहेर यांच्या दोन्ही मुलांच्या दुर्दैवी मृत्यूने गाव व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.


पंचवटीतून चॉपर बाळगणाऱ्या अल्पवयीनांना अटक


दरम्यान, शहर गुन्हेशाखेच्या युनिट एकचे पथक बुधवारी पंचवटी परिसरात गस्तीवर असताना, अंमलदार विलास चारोस्कर यांना दोघे संशयित हे दुचाकीवरून काळाराम मंदिराच्या दक्षिण दरवाजाकडील रस्त्याने हातात चॉपर बाळगून फिरत असल्याची माहिती मिळाली.  पथकाने तत्काळ त्या परिसरामध्ये धाव घेत दोघांना ताब्यात घेतले. दोघेही संशयित अल्पवयीन असून त्याच्याकडून चॉपर व पल्सर दुचाकी, असा 51 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पंचवटी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या


Maha Vikas Aghadi Seat Sharing : मोठी बातमी : वंचितसोबतची चर्चा फिसकटल्यात जमा, संजय राऊतांचे संकेत, प्रकाश आंबेडकरांची BRS सोबत बोलणी सुरू


Mahayuti Vs Maha Vikas Aghadi : प्लॅन होता बारामतीत 'हबकी' डाव टाकण्याचा; पण 'टांग' लागली माढा, मावळ, शिरुर, सातारपर्यंत?