भाजपने माजी मंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांना बीड (Beed) या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. उमेदवारी मिळाल्यानंतर त्या आज (22 मार्च) पहिल्यांदाच बीड जिल्ह्यात गेल्या. यावेळी त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत सभेला संबोधित केले. तसेच 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी मराठा आरक्षण, बीड जिल्ह्यातील मतदार यावर भाष्य केले.
हा विचार मनाला खिन्न करतो
राज्यातील लोक माझ्यावर प्रेम करतात. मला मिळालेल्या संधीमुळे लोकांमध्ये उल्हास आहे. जातीवर आधारित उमेदवार माझ्याविरोधात उमेदवार दिला जाईल, असे सांगितले जात आहे. तसे वृत्त माध्यमांत येत आहे. पण माझ्या आयुष्यात जातीचा कधी विषय आला नाही. मी मुरलीधर मोहोळ, सुजय विखे पाटील यांना शुभेच्छा देते. ते म्हणतात की ताई तुमच्या सभेने आमचा विजय निश्चित होतो. पण बीड जिल्ह्यातील निवडणुकीत जातीआधारित चर्चा का व्हावी. बीड जिल्ह्यातील निवडणूक ही अनुभवावर, काम करण्याची कार्यक्षमता यावरच लढवली जावी, असं वाटतं. पण जातीच्या आधारावर ही निवडणूक लढवली जाते की काय? तशी चर्चातरी होते की काय? हा विचार मनाला थोडा खिन्न करतो, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
सर्व नेते आमच्या बाजूने
अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्ष आमच्यासोबत गेला आहे.पण त्यांच्यातलाच एक नेता शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत गेला आहे. या नेत्याला थांबवणे त्यांना जमले नाही. बीड जिल्ह्यातील मतांची स्थिती थोडी वेगळी आहे. बीड जिल्ह्यातील जवळपास सगळेच बडे नेते आमच्या बाजूने आहेत. पण नेते एका बाजूने आल्यानंतर मतं बदलतात का? हे पाहण्यासाठी मी उत्सूक आहे, असे मतही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.
महादेव जानकर माझ्यासोबत आहेत
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांना महाविकास आघाडीकडून तिकीट दिले जाण्याची शक्यता आहे. शरद पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आपल्या कोट्यातून त्यांना तिकीट देणार आहे. जानकर हे ओबीसी समाजातील महत्त्वाचे नेते मानले जातात. ओबीसींच्या अनेक मेळाव्यांत जानकर आणि पंकजा मुंडे एकत्र दिसले आहेत. जानकरांना मिळणाऱ्या संभाव्य उमेदवारीवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महादेव जानकर यांचं काय चाललंय हे मला माहिती नाही. पण ते माझ्यासोबतच आहेत, असं म्हणत त्यांनी या विषयावर अधिक बोलणं टाळलं. जानकर यांना माढ्यातून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे.
हेही वाचा >